कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : गेल्या वीस वर्षात इतर क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रात देखील झपाट्याने बदल झालेत. या बदलामागे आयटी या टेक्नॉलॉजीची भूमिका महत्त्वाची ठरली. आज उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये इंटरनेटचा वापर अतिशय महत्त्वाचा झाला आहे. आजचे युग हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे असून आता तर त्याही पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार होऊ लागला आहे. अशा काळात संशोधनाचे क्षेत्र मागे कसे राहणार ? संशोधनाचा घसरता दर्जा सुधारण्यासाठी आयटीचा वापर होऊ लागला, आणि प्लॅजेरिझम सारख्या नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअरचा उदय झाला.
शोध प्रबंध जमा करण्यापूर्वी त्याचा दर्जा राखण्यासाठी विद्यापीठीय यंत्रणेमार्फत शोध प्रबंधाचे प्लॅजेरिझम करून घेणे अनिवार्य करण्यात आले. या सॉफ्टवेअरमुळे खऱ्या संशोधकांच्या ज्ञानाचा किंवा बौद्धिक संपदेचा अधिकार अबाधित राहिला आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सी. आय. एन. एस. चे प्रमुख अंकुश कुलकर्णी यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात ग्रंथालय विभाग आणि आयक्यूएसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी मा. कुलकर्णी यांनी विविध विषयात संशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना इंटरनेट संदर्भात येणाऱ्या अनेक अडचणींच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष आणि संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे म्हणाले की “आजकाल प्रत्येक क्षेत्रातील एखादी आवडणारी गोष्ट अंगीकारली जाते परंतु संशोधन क्षेत्रात असे केल्यास ती एक चोरी ठरते. त्यामुळे संशोधकांनी असे करणे टाळले पाहिजे. अंकुश कुलकर्णी मुळात एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रातील ते तज्ञ आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा संशोधकांना निश्चितच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
व्याख्यान सत्राच्या प्रारंभीक उपस्थितांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव म्हणाले की, “पीएच.डी. हा कॉलिटी एज्युकेशन चा एक महत्त्वाचा घटक आहे. आजकाल प्रत्येक संशोधन प्रकाशित होण्यापूर्वी ते अनालाईज्ड व्हावे, ही अपेक्षा नक्कीच व्यर्थ नाही. संशोधकांनी असे संशोधन करावे की प्लॅजेरिझमची वेळच येऊ नये.
व्याख्यान सत्राचे प्रास्ताविक करताना कार्यशाळेच्या समन्वयक ग्रंथपाल प्रा. नीता शिंदे म्हणाल्या की ” ग्रंथालय आणि संशोधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे संशोधनातला दर्जा टिकून ठेवण्यासाठी प्लॅजेरिझम सारख्या सॉफ्टवेअरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. म्हणूनच त्या संदर्भातील संशोधकांच्या जिज्ञासांचे शमन होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज हे आयोजन करण्यात येत आहे.”
यावेळी प्रा शिंदे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय देखील करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ .एन जी शिंदे यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संशोधन मार्गदर्शक प्रो. जे. एस. मोरे, प्रो. एस आर पगारे, डॉ.जी के चव्हाण डॉ. आर डी गवळी, डॉ. एस बी काळे, प्रो. बी. बी. भोसले, प्रो. के. एल. गिरमकर, डॉ. बी. डी. गव्हाणे, डॉ . एस.एम. देवरे, रजिस्ट्रार डॉ .अभिजीत नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.