शेवगाव प्रतिनिधी, दि.०५ : यंदाच्या २०२३ च्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शासनाने एक रुपयात पिक विमा योजना लागू केली. त्याची नोंदणी राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर करणे आवश्यक होते. शेवगाव तालुक्यातील ४६ हजार ९१९ शेतकऱ्यांनी ९० हजार ५१० पिक विमा अर्ज दाखल केले असून, ५३ हजार ३१८.४७ हेक्टर क्षेत्रातील कापूस, तूर, मूग, बाजरी, भुईमूग, आदी क्षेत्र संरक्षित करण्यात आले.
यावेळी खरीप हंगामासाठी केवळ एक रुपयात पिक विमा योजना लागू करण्यात आली, त्याची नोंदणी राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर, आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत (CSC) करण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका कमी असल्याने, सर्व शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
नोंदणीची अंतिम तारीख दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत जाहीर करण्यात आली, मात्र, या दरम्यान अनेक वेळा सर्वर डाऊन असल्यामुळे, शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज सादर करण्याबाबत अडचणी आल्याने, या योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत दि. ३ सप्टेंबर पर्यंत वाढवून देण्यात आली. त्यानुसार ४६ हजार ९१९ शेतकऱ्यांनी तसेच १ हजार ४३६ कर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतला आहे.
राज्य शासनाने यंदाच्या सन २३ – २४ च्या हंगामापासून, सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेत सहभागी करण्यासाठी आपले सरकार, सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्जा मागे चाळीस रुपये देण्यात येणार आहेत.
मात्र शेतकऱ्यांनी एक रुपया व्यतिरिक्त पैसे देण्याची गरज नसतांना, अनेक ठिकाणी सरकार सेवा केंद्रावर शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पैशांची आकारणी केल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्या असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, तालुका अध्यक्ष मेजर अशोक भोसले यांनी दिली. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी, आपले तक्रार अर्ज तहसिलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देण्याचे आवाहन फुंदे व भोसले यांनी केले आहे.