आमदार आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सव संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०५ : आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या, क्रीडा महोत्सवामध्ये अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून, मोठ्या उत्साहात क्रीडा महोत्सव संपन्न झाला असून, विजेत्या संघांना जिल्हा बँकेच्या माजी संचालिका व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

गौतम पब्लिक स्कूलचे, प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या, भव्य क्रीडा महोत्सवामध्ये फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल खेळांचे सामने गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर रंगले. या क्रीडा महोत्सवात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून मुला मुलींचे एकूण वीस संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संघातील खेळाडूंनी आपले खेळाचे अनोखे प्रदर्शन करून क्रीडा महोत्सवात रंगत आणून प्रेक्षकांची मने जिंकली.

क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण प्रसंगी बोलतांना सौ. चैतालीताई यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. जीवनभर खेळाशी निगडित राहून आपले शरीर सुदृढ ठेवा. बाहेरून आलेल्या सर्व खेळाडूंना गौतम पब्लिक स्कूलचे सर्व मैदाने नेहमीच खेळासाठी उपलब्ध राहतील. प्रत्येक स्पर्धेत आपल्याला यश मिळेलच असे नाही. कोणत्याही स्पर्धेत चुका झाल्यास, अपयश स्वीकारावे लागते. त्यामुळे एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घेवून खेळातील चुका सुधारून प्रत्येक स्पर्धेतून धडा घेत आपला खेळ दर्जेदार करा. असा मूलमंत्र त्यांनी स्पर्धेतील उपस्थित खेळाडूंना दिला.

यावेळी एस. जी विद्यालयाचे प्राचार्य मकरंद कोऱ्हाळकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू सुभाष पाटणकर, छत्रपती पुरस्कार विजेते बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. यापुढे देवर्षी आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूल मध्ये, व्यापक स्वरुपात क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचा मानस प्राचार्य नूर शेख यांनी यावेळी व्यक्त केला. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, व्हॉलिबॉल, प्रशिक्षक इसाक सय्यद, सर्व हाऊस मास्टर यांनी काम पाहिले.