कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी आ. आशुतोष काळे यांनी मिळविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून कोपरगाव शहराच्या विकासाचे प्रलंबित असलेले महत्वाचे प्रश्न सुटले असून, मंगळवार (दि.१५) रोजी देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ५.२० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आमदार काळे यांनी कोपरगाव शहरातील जनतेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दिलेल्या वचनाची पूर्तता करून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी तब्बल १३१.२४ कोटी निधी दिला असून, या साठवण तलावाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्याच बरोबर कोपरगाव शहरातील सर्व प्रमुख रस्ते, शासकीय इमारती, स्मशानभूमी, विविध समाजाचे समाज मंदिर तसेच शहर सुशोभीकरणासाठी जवळपास २० कोटी रुपये निधी आजवर दिला आहे.
तसेच कोपरगाव शहराची वाढणारी लोकसंख्या त्यामुळे शहरालगत अनेक उपनगरे निर्माण झाली आहेत. या उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना देखील शहरातील नागरिकांप्रमाणे रस्ते, पाणी, भूमिगत गटार अशा मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी नुकताच १० कोटी रुपये निधी आणला आहे.
मागील अनेक वर्षापासून वंचित असणाऱ्या उपनगरातील नागरिकांना देखील सोयी सुविधा मिळणार आहेत. तसेच अनेक उपनगरातील जे नागरिक शासकीय जागेवर राहत होते. त्या नागरिकांना देखील त्या जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी पाठपुरावा करून, तो प्रश्न मार्गी लावला आहे. अशा अनेक अडचणीच्या प्रश्नांना हात घालून, हे प्रश्न सोडवून कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी आ. आशुतोष काळे प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजनेच्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर योजना अंतर्गत मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ५.२० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासाचे विविध प्रश्न सुटणार असून, कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.