उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे- आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : पाटबंधारे विभागाकडे ७ नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळावी हि मागणी मान्य करण्यात आली असून २३ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
मागील आठवड्यात आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खरीप पिकांसाठी गोदावरी डाव्या उजव्या कालव्याला सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सिंचनासाठी पाणी द्यावे अशी मागणी केली होती. तसेच सर्वच शेतकरी मुदतीच्या आत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले नाही तर लाभधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी देखील मुदतवाढीची मागणी केली होती.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीनुसार आ. आशुतोष काळे यांच्या मागणीचा विचार करून पाटबंधारे विभागाकडून ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दि. २३ ऑगस्ट पर्यंत लाभधारक शेतकरी ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करू शकणार आहे. त्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांनी आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केले नाही. त्या सर्वच शेतकऱ्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे तातडीने दाखल करावे असे, आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

