हव्यास न ठेवता आनंदाने जीवन जगावे- स्नेहलता कोल्हे

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अध्यात्मिक ध्यान केंद्रात रक्षाबंधन साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : चिता ही मेलेल्या माणसांना जाळते, तर चिंता ही जिवंत माणसांना जाळते. आजकाल प्रत्येक माणूस डोक्यावर चिंतेचे ओझे घेऊन जगताना दिसतो. आपण चांगल्या गोष्टीऐवजी दु:खाचा जप करत मानसिक तणावाखाली जगतो आहोत. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. जीवन फार सुंदर आहे. जास्तीच्या अपेक्षा व हव्यास न ठेवता परमेश्वराने जे दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले. 

कोपरगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अध्यात्मिक ध्यान केंद्रात मंगळवारी (२९ ऑगस्ट) राजयोगिनी ब्रह्माकुमारी प. पू. वासंतीदीदी (नाशिक) व प. पू. सरलादीदी (कोपरगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. रक्षाबंधन सणानिमित्त प. पू. वासंतीदीदी व व प. पू. सरलादीदी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना राखी बांधून प्रसादाचे वाटप केले.

यावेळी शहीद सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (रा. दहेगाव बोलका) यांची वीरपत्नी मंगल वलटे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, ॲड. अशोक टुपके, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

रक्षाबंधन सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने कोपरगाव येथे उभारलेली ब्रह्माकुमारीज परमात्मा अनुभूती भवनची वास्तू कोपरगावच्या वैभवात भर टाकणारी आहे. हे केंद्र सर्वांना ऊर्जा देत आहे. ब्रह्माकुमारी प. पू. वासंती दीदी व प. पू. सरलादीदी यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या अध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्यासाठी व देशसेवेसाठी वाहून घेतले आहे.

त्यांचे कार्य फार मोठे आहे; त्या परमात्मा शिव बाबा व प्रजापिता ब्रह्मा यांच्या विचारांचा प्रसार करत आनंदी जीवनाचा मार्ग आपल्याला शिकवत आहेत. त्यांचे विचार आत्मसात करून आनंदाने जगले पाहिजे. रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट नात्याची ग्वाही देणारा, बहीण-भावातील प्रेम दर्शवणारा सण आहे. ब्रह्माकुमारी परमात्मा अनुभूती भवनमध्ये आल्यावर आपल्या सर्वांना बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची, परस्परांमधील स्नेहपूर्ण नात्याची जाणीव होते. रक्षाबंधनच्या निमित्ताने दीदींकडून पुण्यात्म्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत.

लावणीसम्राणी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांच्याविषयी त्या म्हणाल्या, एकेकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकप्रिय नृत्यांगना शांताबाई कोपरगावकर या भिक्षा मागून हलाखीचे जीवन जगत असल्याचे विदारक वास्तव सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मी त्यांना भेटले. तेव्हा त्या मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या त्रस्त असल्याची जाणीव मला झाली. मी प्रेमाने त्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी माझ्याजवळ मन मोकळे केले.

मी त्यांना सोबत घेऊन शिर्डीला नेले व तेथे द्वारकामाई वृद्धाश्रमात दाखल केले. आज त्या तेथे आनंदाने राहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकादशीच्या दिवशी श्री पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना वयोवृद्ध कलावंत शांताबाई कोपरगावकर द्वारकामाई वृद्धाश्रमात राहत असल्याचा व्हिडीओ पाहिला आणि त्यांनी ५ लाखांची मदत देण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली व ती मदत नुकतीच त्यांना सुपूर्दही केली. शांताबाई कोपरगावकर यांना मी मदत केल्यानंतर राज्यभरातून माझे कौतुक झाले.

आपण प्रत्येक कृती ही कौतुकासाठी करत नाही तर देव आपल्याकडून करवून घेतो यावर माझा विश्वास आहे. निराधार शांताबाई कोपरगावकर यांना मायेचा आधार देऊन त्यांना उर्वरित आयुष्य सुखकर जगण्यासाठी मला मदत करता आली. यातून मला मिळालेला आनंद अवर्णनीय आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना असे क्षण खूप वेळा अनुभवास येतात. देवासारखी माणसं भेटतात. आपण म्हणतो की, माणसात देव पाहावा. याच भावनेतून मी गोरगरिबांना सतत मदत करत असते. 

प्रत्येकाच्या जीवनात संकटे येत असतात. हसतमुखाने त्या संकटावर मात करून पुढे जायचे असते. स्त्रीशक्ती प्रचंड आहे. आपल्यातील शक्तीची जाणीव ठेवून पुण्यात्म्यांच्या आशीर्वादाने आनंदाने जगावे. समाजातील प्रत्येकाशी आपले नाते हे स्नेहबंधाचे, प्रेमाचे असावे. सामाजिक, धार्मिक कार्यात समरस झालो तर त्यातून मोठे समाधान मिळते, असेही स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. ब्रह्माकुमारी प. पू. वासंती दीदी व प. पू. सरलादीदी यांनी रक्षाबंधन सणाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. सर्वांनी आध्यात्मिक ज्ञान आत्मसात करून ईश्वरी मार्गाने मार्गक्रमण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.