तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती जबाबदारीने हाताळा – माजी आमदार कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे कोपरगाव तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी खरीप पिके पूर्ण जळून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिण्याचे व शेतीचे पाणी, वीज, जनावरांचा चारा आदी प्रश्न गंभीर बनले आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारीने दुष्काळी परिस्थिती हाताळून ठोस पावले उचलावीत, अशी सक्त ताकीद कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रशासनाला दिली. 

माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी (२ सप्टेंबर) तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना भेटून पाटपाणी, विजेचा प्रश्न, गतवर्षी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान, पीक विमा तसेच नागरिकांना बिबट्यापासून होत असलेल्या त्रासाबाबत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. कोपरगाव तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि पाणी, चारा डेपो, वीज, अग्रीम पीक विमा वाटप व दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याची आग्रही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्याकडे केली. 

सध्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला आवर्तन सुरू आहे. त्या आवर्तनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील बऱ्याचशा चाऱ्यांना पाणी सोडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी तर मिळालेच नाही; परंतु नागरिक व जनावरेदेखील पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी ७ नंबर अर्ज भरूनदेखील त्यांना शेतीसाठी पाणी मिळालेले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने सध्या सुरू असलेल्या खरीप पिकांच्या आवर्तनाचे व्यवस्थित नियोजन करावे व प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी वेळेवर पाणी मिळावे, याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत.

तसेच डाव्या व उजव्या कालव्यावरील अनेक वितरिका नादुरूस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे सदर वितरिकांची तातडीने दुरुस्ती व्हावी, दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने कोपरगावचे हक्काचे पाणी इतरत्र सोडण्यात येऊ नये. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतीसाठी ८ ताससुध्दा पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. फिडर बंद असल्याने विहिरीत उपलब्ध असलेले थोडेसे पाणीदेखील शेतकऱ्यांना पिकांना देता येत नाही. त्यामुळे सततचे भारनियमन त्वरित बंद करून शेतीसाठी अखंडपणे पूर्ण दाबाने सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत महावितरण कंपनीस आदेश द्यावेत.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव व पोहेगाव सर्कलमधील शेतकऱ्यांना गतवर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शासनाचे अनुदान मिळाले आहे; पण त्यातही काही शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. कोपरगाव, दहेगाव बोलका, रवंदे व कोकमठाण या सर्कलमधील एकाही शेतकऱ्याला सततच्या पावसाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. सदर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान तातडीने मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी, अशा मागण्या स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी झालेल्या बैठकीत केल्या.

कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पावसाचा ३३ दिवसांपेक्षा जास्त दिवस खंड पडल्याने खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याप्रमाणे कोपरगाव मतदारसंघातील सर्वच महसुली मंडळांमधील शेतकऱ्यांना सरसकट २५ टक्के अग्रीम पीक विमा मंजूर करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याचे आदेश पीक विमा कंपनीला द्यावेत.

सदर पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना के.वाय.सी. व ऑनलाईन पीक पाहणी (ई-पीक पाहणी) करणे बंधनकारक केले आहे; पण बरेच शेतकरी हे अशिक्षित असल्याने त्यांनी के.वाय.सी. केलेली नाही व सेतू केंद्रामार्फतदेखील सदर के.वाय.सी. वेळेवर होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने त्यांना ऑनलाईन पीक पाहणी करता येत नाही. त्यामुळे सदर पीक पाहणी शासनाकडून व्हावी. कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्या लोकवस्तीत मुक्त संचार करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांनी वन विभागास वारंवार माहिती देऊनही वन विभागाकडून पिंजरा अथवा इतर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांना रात्रंदिवस जागरण करावे लागत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागास तातडीने आदेश द्यावेत, अशीही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.

कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, पाटपाणी, वीज, चारा व इतर समस्यांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसमोर जीवन-मरणाचा बिकट प्रश्न निर्माण झालेला असताना स्थानिक आमदारांनी अजूनही टंचाई आढावा बैठक का घेतली नाही, टंचाई कृती आराखडा बनविण्याबाबत प्रशासनाला सूचना का दिल्या नाहीत, असा सवाल करून स्थानिक आमदार केवळ फोटोबाजी करून प्रसिद्धीचा स्टंट करत असल्याची टीका स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.

याप्रसंगी जलसंपदा विभागाचे गोदावरी डावा कालवा कोपरगाव उपविभागाचे अभियंता सचिन ससाणे, महावितरणचे शाखा अभियंता योगेश सोनवणे, श्री.दीक्षित,भाजपचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, विश्वासराव महाले, माजी पं. स. सभापती शिवाजीराव वक्ते, माजी जि. प. सदस्य केशवराव भवर, राजेंद्र परजणे, कालूअप्पा आव्हाड, सतीश केकाण, सरपंच संदीप देवकर, रवींद्र आगवन, दीपक चौधरी, किसन गव्हाळे, विजय आढाव, वैभव आढाव, प्रसाद आढाव, राजकुमार दवंगे, रामदास शिंदे,प्रभाकर शिंदे, चंद्रकांत वाघमारे, स्वप्नील मंजुळ, गणेश साबळे,कैलास चांदे,निखिल सानप,अतुल सुराळकर, प्रकाश दवंगे, यादवराव संवत्सरकर,किरण गायकवाड,प्रशांत आढाव आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या बैठकीत शेतकऱ्यांचा सध्य परिस्थिती विरोधात तीव्र असंतोष पहावयास मिळाला. शेतकऱ्यांनी आक्रमकपणे प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने  स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रशासनाला परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याची सक्त ताकीद दिली.