कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघात पावसाचा दीर्घकाळ खंड पडून खरीप हंगामातील पिकांच्या मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आगावू २५ टक्के पीक विमा नुकसानभरपाई मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेतली असून शेतकऱ्यांना विमा कंपनीला आगावू २५ टक्के पिक विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिले आहेत अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
जून-जुलै महिन्यात पडलेल्या अत्यल्प पावसावर कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग आदी पिके उभी केली. सर्वच पिके जोमात होती. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होईल अशी आशा लागली होती. परंतु अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघाकडे वरून राजाने पुन्हा एकदा पाठ फिरविल्याने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे उभी पिके जळून गेली व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची पाहणी करावी व शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी व २५ टक्के आगाऊ पिक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे मागील एक महिन्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, पालक मंत्री तसेच जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.
त्या पाठपुराव्याची दखल घेवून अखेर मतदार संघातील शेतकऱ्यांना आगावू २५ टक्के पिक विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिले आहेत. पिक विमा कंपनीकडून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हि आगावू पिक विमा नुकसान भरपाई रक्कम जमा होवून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून उर्वरित पिक विमा नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
बैठकीचे फार्स आणि देखाव्याचे फ्लेक्स लावून विकास होत नसतो व समस्या देखील सुटत नसतात. त्यासाठी आवश्यक असतो पाठपुरावा व प्रामाणिक प्रयत्न. आजपर्यंत केलेला पाठपुरावा व प्रामाणिक प्रयत्न मतदार संघातील जनता पाहत आहे. त्यामुळे मागील एक महिन्याच्या पाठपुराव्यातून २५ टक्के आगाऊ पिक विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत हे शेतकऱ्यांना माहित आहे. दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण न करता मी माझे काम प्रामाणिकपणे करीत आहे.यापुढेही उद्भवणाऱ्या सर्वच अडचणीत मी जनतेसोबत आहे. – आ. आशुतोष काळे.