शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ : शेवगाव तालुक्यात पशुधनावरील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव कायम असून गेल्या चार महिन्यापासून लम्पीच्या दुसऱ्या टप्यात आज अखेर बाधीत जनावरांची संख्या एक हजार २४५ वर गेली असून त्यापैकी एकहजार १०६ जनावरे औषधोपचारानंतर बरी झाली आहेत. या काळात ४२ जनावरे मयत झाली असून त्यात शेवगाव परिसरात सर्वाधिक दहा तर वरुर परिसरातील ७ जनावरे मयत झाली आहेत.
या शिवाय हसनापूर ईपीसेटर परिसरात ६ तसेच भातकुडगाव, शोभानगर व खडका ईपी सेंटर परिसरात मयत जनावराची संख्या प्रत्येकी पाच असल्याची माहिती पशु संवर्धन विभागातून देण्यात आली. सद्य स्थितीत आजारी जनावरांची संख्या ९७ असून त्यात तीव्र आजारी असलेल्या जनावरांची संख्या ६ आहे. लम्पीचा प्रादूर्भव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनावराचे आठवडे बाजारावर तूर्तास बंदी घातली आहे.
मात्र, ज्या भागात लम्पीचा प्रादूर्भाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्या परिसरातील जनावरांचे आठवडे बाजार जिल्हा प्रशासनाने काही अटी व शर्तीनुसार पुर्ववत सुरु करण्यास अनुकुलता दर्शविलेली असली तरी शेवगाव तालुक्यात मात्र, लम्पीचा प्रादुर्भाव कायम असल्याने शेवगाव व बोधेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार बंद राहणार असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ऋषिकेश खेतमाळीस यांनी दिली.