शेवगाव प्रतिनिधी, दि. ०६ : तालुक्यातील बालमटाकळी येथील आबसाहेब व अशोक शिंदे या दोन शेतकऱ्याचा साडेतीन एकर उसाचे क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडून लाखो रुपयाचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती गावात समजताच शंभरच्या वर युवक घटना स्थळी मदतीसाठी धावून आले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थिचे प्रयत्न केले, त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांचे संभाव्य मोठे नुकसान टळले.
महावितरण विभागाच्या हालगर्जीपणामुळे देखभाल दुरुस्तीचे काम वेळेत झाले नाही. त्यामुळे शिवारातील विद्युत तारेचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने ही दूर्घटना घडल्याचा आरोप पिडीत शेतकऱ्यांनी केला. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, माजी सभापती रामनाथ राजपुरे, हरिश्चंद्र घाडगे आदिनी भेट देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.