नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाचे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी स्वागत केले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ही योजना सुरू करून महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे. गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करणारी ही योजना असून, त्यामुळे मुलींच्या सक्षमीकरणाला मोठे बळ प्राप्त होणार असल्याचे सांगून ही योजना सुरू केल्याबद्दल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुली लखपती होणार आहेत.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीच्या नावाने एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.

याबाबत अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. फडणवीस यांनी ही योजना जाहीर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेला शब्द पाळला आहे याचा आनंद होत आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी व मुलींना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. यापूर्वी ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ ला देखील मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यापाठोपाठ ‘लेक लाडकी योजना’ ही योजना राबवण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने व राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. सरकारच्या वतीने मुलींच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ‘सुकन्या समृद्धी योजना’ राबवली जात आहे, तर राज्य सरकारकडूनही अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये मुलींच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलते.

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही अशीच एक योजना आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुलीच्या जन्मावर ५० हजार रुपये दिले जातात. ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी राबविण्यात येत आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्याचा मोठा फायदा होत आहे.

आता राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेऊन गरीब कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण व इतर प्रश्न सुटणार असून, मुलीच्या माता-पित्यांची आर्थिक अडचण दूर होणार आहे. मुलींचे भवितव्य घडविणाऱ्या या योजनेमुळे प्रगतीला चालना मिळेल, असे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.