पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची निलंबाणाची मागणी
शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : आपल्यावर व बंधू उदय मुंडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला वाळू चोरीचा खोटा गुन्हा असून तो मागे घेण्यात यावा तसेच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येऊन त्यांना निलंबित करावे. या मागणीसाठी विविध राजकीय पक्षाच्या वतीने सोमवारी ( दि ४ ) येथील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली.
या वेळी मुंडे म्हणाले, या घटनेतील फिर्यादी मुंगीचे प्रभारी मंडल अधिकारी आय्या अण्णा फुलमाळी यांनी शेवगावचे तहसीलदार यांच्याकडे दि.२५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रान्वये आपण पिंगेवाडी येथे जाऊन वाळू साठ्याबाबत पहाणी करून याबाबत २५ ब्रास वाळूचा पंचनामा करून अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिसात गेलो असता त्यांनी ‘ पिंगेवाडीच्या सरपंचांचा जबाब घेऊन त्यात संशयिताचे नाव टाकून फिर्याद देण्याचे सुचविले.
सदरची फिर्याद अज्ञात इसमाच्या नावे दाखल करणे कायदेशीर व न्यायिक दृष्ट्या योग्य होते. असे फिर्यादी फुलमाळी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल करताना त्यामागे काहीं षडयंत्र असल्याचा आपला संशय असल्याने याबाबत संपूर्ण चौकशी करून आपले नाव या गुन्ह्यातून वगळावे अशी मागणी आपण संबंधितांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान शेवगाव पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. मात्र गेल्या वर्ष दीड वर्षापासून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल विविध पक्ष व संघटना यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू होते. गुन्हेगारी तसेच सामाजिक धार्मिक परिस्थिती हाताळताना त्यांना वेळोवेळी अपयश आले, याबाबत आपण जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यामुळे आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामागे वैयक्तिक आकस व द्वेष असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.