श्री काळ भैरवनाथ जनसेवेसाठी नेहमी ऊर्जा देत राहो- स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : भगवान श्री शंकरांचा पाचवा अवतार मानले जाणारे श्री काळ भैरवनाथ यांची जयंती कोपरगाव शहरातील सराफ बाजार भागातील पांडे गल्लीत असलेल्या श्री काळ भैरवनाथ मंदिरात मंगळवारी (५ डिसेंबर) मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते श्री काळ भैरवनाथ देवाची पूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी श्री काळ भैरवनाथांचे मनोभावे दर्शन घेऊन सर्व नागरिकांना सुखी, समाधानी व निरोगी दीर्घायुष्य लाभो, सर्व संकटे दूर होऊन सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो, अशी प्रार्थना श्री काळ भैरवनाथांच्या चरणी केली.

श्री काळ भैरवनाथ जयंती उत्सवानिमित्त मंदिरात आज महाभिषेक, होमहवन, पूर्णाहुती, महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी रुद्र याग, होम हवन पूजेस उपस्थित राहून सर्व भाविक-भक्तांना श्री काळ भैरवनाथ जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. महाआरतीनंतर महाप्रसादाचा (भंडारा) कार्यक्रम झाला. असंख्य भाविक-भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रारंभी श्री काळ भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने राजेंद्र शिंगी, विनोद (बंटी) पांडे आदींनी स्नेहलताताई कोल्हे यांचे स्वागत केले.

राजेंद्र शिंगी यांची कोपरगाव पीपल्स बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री काळ भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रुद्र याग, होम हवन व पूजेचे पौरोहित्य वैभव जोशी, गोविंद जोशी, श्याम जोशी व सहकाऱ्यांनी केले. किरण आमले, रोहित तिवारी, कानडे आदी सपत्नीक पूजेसाठी बसले होते.   

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, श्री काळ भैरव हे दहा भैरवांचे अधिपती असून, त्यांना भगवान शंकरांचा पाचवा अवतार मानले जाते. कालभैरव, काळभैरवनाथ, भैरव, काळभैरी, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी (नाथ), भैरोबा अशी त्यांची अनेक नावे आहेत. भैरव हा देवीच्या शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते. कालाष्टमीच्या दिवशी भगवान भैरव यांचे व्रत आणि पूजन केले जाते.

श्री काळ भैरव जयंती हा एका शक्तिशाली देवतेचा जन्मोत्सव साजरा करण्याचा, श्री काळ भैरवांचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळविण्याचा विशेष दिवस आहे. हल्लीच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण संकटकाळात परमेश्वराचा धावा करतो. भगवान भैरव आपल्या भक्तांचे नेहमी संरक्षण करतात. त्यांच्या उपासनेने नकारात्मक शक्ती नष्ट होण्यास मदत मिळते. श्री काळ भैरवनाथांची मनोभावे पूजा-आराधना केल्यास माणसाला सर्व प्रकारच्या भयापासून मुक्तता मिळते. साधकाच्या सर्व समस्या दूर होतात, अशी भक्तांची धारणा आहे.  

श्री काळ भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. मंडळाने धार्मिक व सामाजिक कार्यातून एक चांगला पायंडा पाडला असल्याचे सांगून कोल्हे यांनी याबद्द्ल मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. कोल्हे कुटुंबीय सामाजिक व धार्मिक कार्याला नेहमीच पाठबळ देत आले असून, यापुढील काळातही श्री काळ भैरवनाथ तरुण मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारूणकर, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंगी, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, वैभव आढाव, विजयाताई देवकर, आनंदशेठ विसपुते, उद्धवशेठ विसपुते, संजय भडकवाडे, बालाजी अंबोरे, पप्पू मंडलिक, अनिकेत पांडे, बंटी पांडे, सिद्धार्थ पांडे, राजेंद्र मंडलिक, योगेश मंडलिक, नरेंद्र विसपुते, संजय बागुल, सुनील पांडे, प्रसन्न पांडे, रोहित तिवारी, कार्तिक बागुल, सुनील पांडे, अरविंद अग्निहोत्री, किरण पांडे, राहुल पांडे, मंगेश पांडे, रंजन भडकवाडे, संजय मंडलिक, गणेश शिंदे, सचिन माळवे, रणजीत भडकवाडे, सार्थक भडकवाडे, सोनू माळवे, किशोर मंडलिक, बाळू मंडलिक, आदित्य अग्निहोत्री, श्याम जंगम, वीरेंद्र विसपुते, गणेश रोडे, पप्पू पडियार, संतोष साबळे, कानडे, गर्जे आदींसह श्री काळ भैरवनाथ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.