शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तम संसदपटू, सदैव कार्यमग्न असणारा कार्यकर्ता व सामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारा युवा नेता राजीव राजळे यांच्या रूपाने शेवगाव पाथर्डी तालुक्याला लाभला. एक व्यासंगी वाचक, शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्राची उत्तम जाण असलेलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व गमावल्याचे दुःख मनात कायम आहे. राजीव राजळे यांना अभिप्रेत असणारे समाजाभिमुख कार्य शेवगाव येथील राजळे मित्र परिवार करत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याच्या भावना नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केल्या.
दिवंगत आमदार राजीव राजळे याच्या ५४ व्या जयंती निमित्त येथील राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने समाजात वाचन संस्कृतीचा जागर सुरु राहण्याच्या उद्देशाने आयोजित राजीव बूक फेस्ट २०२३ पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ आ. तांबे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
तांबे म्हणाले, आयुष्य लहान असले तरी कर्तृत्व महान हवे. स्व. राजीव राजळे यांची सर्वच क्षेत्रात प्रचंड उंची होती. त्याच्या अचानक जाण्याने परिसरासह जिल्हा व राज्याची मोठी हानी झाली असून येथील मित्र मंडळाचा वतीने गेल्या सहावर्षा पासून सुरु असलेला पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम राज्याला दिशादर्शक असल्याचा गौरव करून आगामी काळात एकाच ठिकाणी पुस्तक प्रदर्शन करण्याऐवजी एखाद्या फिरत्या वाहनाद्वारे हा उपक्रम खेड्या पाड्यात वाड्या वस्तीवर राबविण्याची सुचना त्यांनी केली.
यावेळी परभणीच्या विवेकानंद करिअर अकादमीचे संचालक ज्येष्ठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे अस्सल ग्रामीण शैलीतून उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले, आई-वडिलांचे सुख स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सतत परिश्रम करत रहा दुसऱ्यांचे स्टेटस पहात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे स्टेटस बनवण्यासाठी धडपडत रहा. जीवनात आव्हान जेवढे मोठे, तेवढेच मोठे यश आपल्याला मिळत असते. सोशल मीडियावर सतत व्यस्त असणारी तरुणाई जर पुस्तक वाचनात व्यस्त झाली तर मस्त जीवन जगू शकते, त्यासाठी वाचते व्हा.
जी माणसे लोकासाठी जगतात तीच लोकांच्या स्मरणात राहतात. युवकांनी आपल्या सुख दुःखाची तुलना इतरांसी करू नये. त्यामुळे जीवनात निराशा येते. यशात सर्वजण तुमच्या सोबत राहतात मात्र अपयशात कोणी सहभागी होत नाही. हे वास्तव लक्षात घेऊन युवा पिढीने कोणाच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे स्मरण ठेवून उत्तुंग यश प्राप्त करावे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. तांबे यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तके परिसरातील विविध शैक्षणिक संस्थेसह ग्रामिण परिसरातील स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, माजी नगरसेवक सागर फडके, चारुदत वाघ, शिवाजी भिसे, अभिजित लुणिया, संभाजी काटे, गंगा खेडकर, कैलास सोनवणे, रामजी केसभट, भाऊसाहेब मुरकुटे, विष्णु घनवट यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. राजीव राजळे मित्रमंडळाचे महेश फलके यांनी प्रास्ताविक केले. निलेश मोरे यांनी सुत्र संचलन केले, गणेश रांधवणे यांनी आभार मानले.