कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : कोपरगाव मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा मंगळवारी दौरा आहे. यांच्या कुटुंबात ३५ वर्षे खासदारकी होती, कोपरगाव मधील जनतेनेही त्यांना मते दिलेली आहे. कोपरगाव साठी यांनी केलेले एखादे रचनात्मक काम दाखवा, राहाता तालुक्यात सैरभैर झाल्यामुळे ते कोपरगाव येथे येऊन नैराश्य काढण्याचे प्रयत्न करत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लीगल विभागाचे प्रदेश सचिव नितीन शिंदे यांनी केली.
शिंदे पुढे म्हणाले, पालकमंत्री आपल्या पदाचा वापर फक्त राजकारण करण्यासाठी करतात. त्यांच्यामुळे कोणत्याच तालुक्याचे कधीही भले झालेले नाही हा इतिहास आहे. त्यामुळे कोपरगावच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांचे मांडलिकत्व स्वीकारू नये. कोपरगावातील जनतेला ते आवडणार नाही. पालकमंत्र्यांना कोपरगावशी काहीही देणे घेणे नाही. पालकमंत्री महोदयांना सत्तेची अनेक महत्त्वाची पदे मिळाली. त्यांच्या कुटुंबातही खूप मोठी सत्ता राहिलेली आहे. कोपरगावातील नागरिकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या अगोदर मतदान केलेले आहे.
आजवर त्यांनी कोपरगावसाठी केलेले एखादे विकास काम दाखवता आले तर दाखवावे असे ही शिंदे म्हणाले. कोपरगांवात कोणते प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री यांनी आजवर प्रयत्न केले, हेही त्यांनी सांगावे. खरे तर राहाता तालुक्यात सैरभैर झाल्यामुळे आपले नैराश्य काढण्यासाठी ते कोपरगावात येत आहेत. ते पालकमंत्री आहेत, त्यांचे स्वागत. मात्र तुमचे कोपरगाव बद्दल उफाळून आलेले प्रेम हे, पुतना मावशीचे आहे, असाही घनाघात शिंदे यांनी केला.
पालकमंत्री असल्याने कोपरगावातील प्रश्न त्यांनी समजून घेतले तर आनंदच आहे. मात्र हे सर्व करत असताना राहाता तालुक्यातील प्रश्नांचाही त्यांनी अभ्यास करावा. नगरमनमाड रस्ता अजून पर्यंतही का होत नाही? जगभरातून येणाऱ्या भाविक भक्तांना मनस्ताप कोणामुळे सहन करावा लागतो आहे? कोल्हारचा पूल वर्षानुवर्ष तसाच लटकलेला आहे, कोपरगाव मध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येताना पालकमंत्री यांनी याही प्रश्नांची उत्तरे घेऊन यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले.