काका कोयटे कल्पक नेतृत्व – राधाकृष्ण विखे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : पतसंस्था चळवळीला योग्य दिशा देण्याचे काम काका कोयटे करत असून त्यांचा महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ वाढविण्यास व मजबूत करण्यास मोठा हातभार आहे. त्यांनी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. त्या विश्वासावर पतसंस्था चळवळ टिकली असून ही पतसंस्था चळवळ समृद्ध केली. त्यांचे नेतृत्व कल्पक असल्याने त्यांनी शहरातील प्रभाग २ मधील उपनगरांचा माजी नगरसेवक जनार्दन कदम व नगरसेविका दिपा गिरमे यांच्याद्वारा विकास साधला आहे. असाच हातभार कोपरगाव तालुक्याच्या विकासात ही लावावा. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखे यांनी केले.

प्रभाग २ मधील विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि अहमदनगर जिल्हा पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखे यांचेकडे पाठपुरावा करून मा.विखे यांनी त्यांची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत नागरी दलीतेत्तर वस्ती सुधारणा योजना अंतर्गत १ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

शिर्डी जिल्हा करून त्याला साईनगर असे नाव देऊन महापालिका जाहीर करावी. या महानगरपालिकेत कोपरगाव, शिर्डी, राहाता यांचा समावेश करून कोपरगाव तालुक्याच्या विकासाच्या वाटा खुल्या करून द्याव्यात. अशी मागणी काका कोयटे यांनी मंत्री महोदयांकडे केली असता उपस्थितांनी हात वर करत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

त्या निधी अंतर्गत सुभद्रानगर भागातील पेव्हींग ब्लॉक बसविणे, जानकी विश्व भागातील रस्त्याचे डांबरीकरण करणे, डॉ.भांडगे घर ते संजीवनी जन.स्टोअर्स रस्त्याचे डांबरीकरण, साईडपटटीस पेव्हींग ब्लॉक बसविणे, येवला रस्ता ते स्वामी रंग अपार्टमेंट ते सरोदे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणे करणे, कांगुणे घर ते निवारा ट्रेडर्स पर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे आदी कामांचे भूमिपुजन करण्यात आले.

तसेच कोपरगाव व राहाता तालुक्यातील एम.आय.डी.सी अनुदान दिल्याबद्दल मा.राधाकृष्ण विखे यांचा जाहीर सत्कार व राजेश परजणे यांची राष्ट्रीय डेअरी विकास (एनडीडीबी) या संस्थेच्या संचालकपदी निवड, डॉ.रामदास आव्हाड यांना भारत सरकारच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि झी मराठी वाहिनी सारेगमप लिटल चॅम्प २०२३ ची महाविजेती गौरी अलका पगारे यांचा सन्मान सोहळा प्रभाग २ मधील जानकी विश्व कॉलनीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

जानकी विश्व परिसरातील नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या, घरावर गुढ्या उभारून, फुले उधळत मा.राधाकृष्ण विखे यांचे स्वागत केले. तसेच शहर व उपनगरातील प्रलंबित विकास कामासंदर्भात मा.मंत्री महोदय यांना निवेदने देण्यात आली.

विखे पुढे म्हणाले की, राहाता व कोपरगाव तालुक्यातील एमआयडीसी देशातील अव्वल एमआयडीसी ठरेल. या दृष्टीने पुढील पावले उचलली जातील. कोपरगावातील या तीन त्रिमूर्तींमुळे कोपरगावचा सन्मान वाढला आहे. यातील गौरी अलका पगारे हिचे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे. कारण हिने प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केले आहे. त्यामुळे प्रवरा शिक्षण समूह गौरीला दत्तक घेऊन शिक्षणाबरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करून देत तिची जबाबदारी स्वीकारेल.

मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मा.राधाकृष्ण विखे यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रभाग २ साठी निधी मिळाल्यामुळे या भागातील विकास करता येत आहे. राहाता व कोपरगाव तालुक्यात एमआयडीसी मंजूर केली असून तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर कोपरगाव तालुक्यात विकासाची गंगा वाहील. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ व समीर आत्तार यांनी केले. प्रांताधिकारी माणिक आहेर, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख (शहरी), वासुदेव देसले (ग्रामीण), महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजप नेते रवी बोरावके, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, अजित लोहाडे, कैलासशेठ ठोळे, सुधा ठोळे, विजयजी बंब, डॉ.अजय गर्जे,

मनोज अग्रवाल, दिपक विसपुते, उत्तम शहा, राजेंद्र शिरोडे, तुलसीदास खुबाणी, आशुतोष पटवर्धन, भरत मोरे, मुन्ना मन्सूरी, अस्लम शेख, अमित लोहाडे, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष सुमितजी भट्टड, रामदास थोरे, सिद्धेश कपिले, प्रदीप साखरे, डॉ.विलास आचारी, अरविंदशेठ भन्साळी, चंद्रकांत नागरे, गुलशनज होडे, अरविंद पटेल, शिवकुमार सोनेकर, राजेंद्र शिंगी, दिपक अग्रवाल, किरण शिरोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, मंदार पहाडे, विनायक गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार देविदास झाल्टे यांनी मानले.

कार्यक्रमाचे अतिशय आखीव, रेखीव, सुरेख नियोजन माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी केले. मा.मंत्री महोदयांवर फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.