विखेंनी इतरांची गॅरंटी घेण्यापेक्षा स्वत:ची गॅरंटी घ्यावी – विवेक कोल्हे

विखेंच्या गॅरंटीमुळेच पाच आमदारांचा पराभव

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.७ : पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे ज्यांची गॅरंटी घेतात, त्यांचा पराभव निश्चित असतो. म्हणुनच २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपच्या तब्बल पाच आमदारांचा पराभव झाला. त्यामुळे विखेंची गॅरंटी म्हणजे चायनामेड गॅरंटी आहे. असे म्हणत जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी निशाणा साधला आहे. 

राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कोल्हे यांच्यावर निशाणा साधत तालुक्याचे राजकारण ढवळून काढले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असुन त्यांच्या भावी आमदारकीची गॅरंटी घेतो. म्हणत भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या विरोधकांना बळकटी देत असल्याचे उघड होताच बुधवारी सायंकाळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या विश्राम गृहावर विवेक कोल्हे यांनी पञकार परिषद घेवून मंञी विखे यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

कोल्हे बोलताना पुढे म्हणाले की, ३५ वर्षापासुन विखे परिवाराकडे लाल दिवा सर्व संस्थांचे पदं, खासदार असुनही कोपरगावला काहीही दिले नाही. कोपरगाव तालुक्यावर यापूर्वी अनेक संकटं आली. तेव्हा विखे कधी फिरकले नाही. महसूल मंञी होवून दिड वर्ष झाले तरी फिरकले नाही. किरकोळ विकास कामाच्या उद्घाटणासाठी हेलिकॉप्टर नादूरूस्त झाले. तरी खाजगी विमान करुन कोपरगाव मध्ये दौरा करतात. यावरून विखेंचा कोल्हे विरोधी वास येत असल्याची जाणीव होते. 

विखे विरोधात जनआक्रओश होता. जनतेच्या आग्रहाखातर गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली. सहकाराच्या निवडणुकीपुरते थोरात यांच्या बरोबर राजकारण केले. त्यानंतर त्यांच्याशी कधी जवळीकता केली नाही. तेव्हा त्यांचं बोट धरण्याचा प्रश्न येत नाही. थोरात यांच्या बरोबर माझे राजकीय कसलेही संबंध नाही. केवळ गणेशच्या निवडणुकीचा राग मनात धरुन विखे विरोधात बोलतात हे त्यांना न शोभणार आहे. 

विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे हे भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढवून १५ हजार मते घेतली, व केवळ ८०० मतांनी कोल्हे यांचा पराभव होतो. कोल्हेंचा पराभव केल्याच्या बदल्यात विखेंनी आपल्या मेव्हण्याला महानंद दूध संघाचे अध्यक्ष करतात. केवळ कोल्हेंना पराजीत करण्याची रणनीती विखेंनी आखली होती. हे आताच्या त्यांच्या दौऱ्यावरुन उघड झाले. आता पुन्हा आमच्या विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न विखे करीत आहेत. पण विखेंनी आता काहीही केले तरी कोपरगावची जनता ते सहन करणार नाही.

आमचा मतदार संघ इतका लाचार नाही की, बाहेरच्या व्यक्तीने येवून इथला आमदार निवडून आणण्याची गॅरंटी घ्यावी. येथील स्थानिक आमदारांनी विखेंची जहागिरी पत्करली तरी जनता स्वाभिमानाने निर्णय घेईल. आता विखेंनी इतरांची गॅरंटी घेण्यापेक्षा स्वत:ची गॅरंटी घ्यावी. आम्ही भाजप पक्ष वाढवून बळकटी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना विखेंनी पक्ष श्रेष्ठींच्या व पक्ष संघटनेच्या निर्णया विरोधात काम करुन अपमानित करीत आहेत.

विखेंच्या अंतर्गत कुरघोडी मुळेच पाच आमदारांचा पराभव झाल्याने त्यांचे परिणाम राज्यावर झाले. अशा चुकीच्या लोकांच्या धोरणामुळे पक्षाचे नुकसान झाले. असे म्हणत कोल्हे पुढे म्हणाले की, विखेंच्या कार्यपध्दती बद्दल पक्ष श्रेष्ठीकडे आपली व्यथा मांडणार आहे. विखे सारख्या जेष्ठ नेत्यांकडून अशी खालच्या पातळीवर काम करण्याची अपेक्षा नव्हती.

कोल्हे परिवार गेल्या दहा वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ आहे. जनतेचे प्रश्न सोडवून पक्ष मजबूत करतोय. संघटना वाढतोय आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळतोय म्हणूनच विखे कोल्हे परिवारा विरोधात षडयंत्र रचत आहेत. अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. जागा वाटपाचे निश्चित झाले नसताना विखे विरोधकांची गॅरंटी घेतात या वरून विखे, कोल्हे विरोधी काम करत असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले आहे असेही शेवटी कोल्हे म्हणाले.