५० एक्कर शासकीय जागा बळकावल्याचा आरोप
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव व शेतकरी विकास संघ या नावाने तब्बल ५० एक्कर ३३ गुंठे शासकीय मालकीची जागा तालुक्याचे आजी माजी आमदार अर्थात काळे व कोल्हे यांनी बळकावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व बीआरएसचे नेते बाळासाहेब जाधव यांनी केला असुन शासकीय जागा शासनाने त्वरित ताब्यात घ्यावी या मागणीसाठी चार दिवसांपासून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करीत आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना बाळासाहेब जाधव म्हणाले की, सन २०१५ साली न्यायालयाने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना कोपरगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टने ताबा केलेली ५० एक्कर ३३ गुंठे ही जागा सिटी सर्व्हे नंबर १९३५अ मध्ये असुन त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. हि जागा शासकीय मालकीची असल्याने ती त्वरित १५ दिवसात ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तेच आदेश जिल्हाधिकारी यांनी शिर्डीचे प्रांताधिकारी यांना दिले. प्रांताधिकारी यांनी तेच आदेश कोपरगावच्या तहसीलदार व तहसीलदार यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकिऱ्यांना दिले.
माञ आजपर्यंत एकाही शासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित जागा ताब्यात घेण्याचे धाडस केले नाही. यावरून शासकीय यंञणेवर राजकीय दबाव असल्यामुळे शासकीय जागा ताब्यात न घेता राजकीय लोकांच्या ताब्यात ठेवली आहे. ज्या कारणासाठी शासनाने हि जागा दिली होती त्यासाठी वापर न करता खाजगी मालकी सारखी शासकीय जागा वापरून कोट्यावधी रुपये कमावले जात आहेत.
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथील जागा काळे यांच्या ताब्यात तर विकास संघाची जागा कोल्हे यांच्या ताब्यात आहे. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने शासकीय जागा ताब्यात घेवून तिथे व्यवसायिक, शाॅपिंग काॅम्प्लेक्स, मंगल कार्यालय, मंदीर व नव्याने काॅल सेंटर बांधून दर वर्षी कोट्यावधींची कमाई केली जाते. जनतेचे कैवारी म्हणणारे तालुक्याचे नेतेच जर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन कोट्यावधी रूपये कमवत आहेत त्यांच्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही.
माञ तालुक्यातील एका गावात काही नागरिकांनी निवारा म्हणुन शासकीय जागेत राहत होते तर त्या गावावर शासनाने जेसीबी फिरवून गाव उध्वस्त केले. मग या बड्या नेत्यांच्या अतिक्रमणांवर शासनाचे अधिकारी गप्प का बसतात. जो पर्यंत संबंधीत जागा शासन ताब्यात घेत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण सुरु राहील असेही शेवटी बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.
दरम्यान बाळासाहेब जाधव हे तालुक्यातील दोन बड्या नेत्यांच्या अतिक्रमणांविरोधात आवाज उठवल्यानंतर संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्याचे नेतेच यावर आपली काय भूमिका मांडतात, प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.