कौटुंबिक मूल्य व सामाजिक संस्कार जतन करणे काळाची गरज

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : कायदा हा स्थिर नसून प्रवाही असतो सामाजिक स्थित्यंतरानुसार बदलणाऱ्या कायद्याचे अद्ययावत ज्ञान प्रत्येकाला असावे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो ॲक्ट) हा कायदा महाविद्यालयीन तरुण तरुणींनी अभ्यासायला हवा. शालेय अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणे महत्त्वाचे आहे. गुन्हे घडल्यानंतर कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करण्यापेक्षा गुन्हे घडू नयेत. यासाठी कौटुंबिक मूल्य व सामाजिक संस्कार जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शेवगाव विधी सेवा समिती अध्यक्षा तथा प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश संजना जागुष्टे यांनी केले.

तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोक्सो ॲक्ट कायदेविषयक मार्गदर्शन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी आयोजित शिबीरात कायदा नेमका कोणासाठी?, कायद्यातील नवीन तरतुदी कोणत्या? या प्रश्नाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पोक्सो कायद्याविषयी मुला मुलींच्या पुरतं शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश एम. बेंद्रे यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रामदास बुधवंत, उपप्राचार्य संजय कुलकर्णी पर्यवेक्षक गोकुळ घनवट, उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर, किरण अंधारे, विधी सेवा प्रमुख महेश जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. शैलेश भारदे, प्रा.नितीन मालानी, अनुराधा जोशी, राजश्री कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. अँड.के.के.गलांडे यांनी प्रास्ताविक केले, निलेश मोरे यांनी सूत्रसंचलन केले तर प्राचार्य शिवदास सरोदे यांनी आभार मानले.