निकोप स्पर्धेतून ज्ञान, प्रेम आणि मैत्री वृद्धिंगत होवून आदर वाढतो – पुष्पा काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ :  स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जायचे आहे. स्पर्धेशिवाय जगण्याला मजा नाही आणि स्पर्धा असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही. त्यामुळे स्पर्धेचे नेहमीच स्वागत करा परंतु स्पर्धेत सहभागी होतांना स्पर्धा हि निकोप असावी त्यामुळे स्पर्धा संपली की, ज्ञान, प्रेम, आणि मैत्री वृद्धिंगत होवून एकमेकांप्रती आदर वाढतो. असे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका व राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी केले.

सालाबाद प्रमाणे याहीवर्षी स्व.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय सुरेगाव-कोळपेवाडी येथे भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन पुष्पा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.

या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, माजी संचालक अरुण चंद्रे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य कचरू कोळपे, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिक कोळपे, सुरेगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सुमन कोळपे, उपसरपंच सीमा कदम, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य सुखदेव काळे, श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, बाळासाहेब ढोमसे, रयत बँकेचे व्हा. चेअरमन दिलीप डहाळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

त्या पुढे म्हणाल्या की, स्पर्धा म्हणजे एकाच गोष्टीसाठी चालणारी चढाओढ. मात्र, हि चढाओढ किंवा स्पर्धा निकोप असावी, मन देखील निष्पाप असावे आणि आपल्या बरोबर स्पर्धेत असणाऱ्यांना देखील सोबत घेवून चालणारी असावी. असा विचार कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी आयुष्यभर जपला. जो आपल्या मागे आहे त्याला सोबत घेवून त्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच दुसऱ्याच्या प्रगतीत आनंद मानला. तीस वर्षापूर्वी ग्रामीण भागात आठवी नंतर मुलींची संख्या कमी होत असे. त्यावेळी सुशीलामाई काळे यांनी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु करण्याचा आग्रह धरला.

त्यामुळे मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु होवून मोठ्या प्रमाणात मुली उच्च शिक्षण घेवून प्रगती करीत आहेत. हा सुशीलामाईंच्या विचारांचा दूरदर्शीपणा असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनाची सवय ठेवा, शिक्षण घेत असतांना स्पर्धेत सहभागी व्हा, भीती बाजूला ठेवून स्पर्धेची योग्य तयारी करून निकोप स्पर्धा करा हि स्पर्धा नेहमीच तुम्हाला जमिनीवर ठेवेल असा मौलिक सल्ला पुष्पा काळे यांनी यावेळी दिला.

यावेळी अरुण चंद्रे म्हणाले की, सहकार, शिक्षण क्षेत्रात राज्याचे नेतृत्व करणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या केलेल्या भव्य दिव्य विस्तारात सुशीलामाई काळे यांचे मोठे योगदान होते. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मागे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामागे लक्ष्मीबाई पाटील त्याप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या मागे सुशीलामाई खंबीरपणे उभ्या असल्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे एवढे मोठे समाजकार्य करू शकले. 

उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे म्हणाले की, समाजात सर्व सामान्यांच्या उपयोगी पडणारी अशी फार थोडी माणसे असतात. जी माणस सर्वसमान्यांच्या उपयोगी पडतात त्यांची उन्नती करतात त्यापैकी एक सुशीलामाई काळे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या हेमलता गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य मधुकर गोडे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.