कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : तालुक्यातील शिंगणापुर येथील संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी उन्नत भारत अभियान अंतर्गत मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मानवी मुल्य अभ्यासक्रमांतर्गत कोकमठाण, येसगाव, नाटेगाव, संवत्सर, शिंगणापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासकीय योजनांची जनजागृती केली. संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्रा.एस. एस.राज यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित काकड, आदित्य जगताप, रितेश जामदार, प्रणव गोसावी, अथर्व जामदार, व सत्यम जाधव विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला.
अमित कोल्हे म्हणाले की, संजीवनी अभियांत्रीकी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच बाह्य जगात घडणाऱ्या सामाजिक घटनांची शिकवण देऊन उन्नत भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचे गट तयार करून वेगवेगळे प्रकल्प दिले जातात, सहभागी प्राध्यापक त्याबाबत नेमकेपणाने काय करायचे याच्या सूचना विद्यार्थ्यांना देतात, त्याअंतर्गत या विद्यार्थानी शेतकरी व्यथा जाणून घेतल्या. केंद्र व राज्य शासनाच्या असणाऱ्या सर्व कृषी योजनांची माहिती देऊन त्याबाबत जनजागृती केली.
काही शेतकऱ्यांनी जमीनी नापीक राहतात. त्यात उन्नत भारत अंतर्गत काय उपाययोजना करता येतील याबाबत शासनाने विचार करावा असे सांगितले. शेतकऱ्यांची शेती हवामान आधारित असल्याने त्याबाबत शासनाने अवकाशात हवामान विषयक माहिती देणारे उपग्रह सोडून त्याबाबत वेळोवेळी केलेली जनजागृती शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर ठरली असल्याचे मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
कोकमठाण, येसगाव, नाटेगाव, संवत्सर, शिंगणापूर भागात विद्यार्थ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या त्यांनी शासनाच्या एक रुपयात पीकविमा, घरकुल, उज्वला गॅस, अनुदानीत बी-बियाणे, पीक लागवडी पुर्वी आणि त्यानंतर करावयाच्या शास्त्रोक्त उपाययोजनांची कृषी विभागाकडून माहिती तसेच ऊस लागवडी पूर्वी नेमकेपणाने पीक उत्पादन वाढीसाठी काय करावयाचे याची माहितीही कारखान्याच्या शेतकी विभागाकडून मिळाल्याचे सांगितले.
त्याचबरोबर पाटपाण्याच्या व वीजेच्या गैरसोयीबद्दलही माहिती देत शासनाने त्या दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना समाज जीवनात दैनंदिन काम करताना उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या शिक्षणाचा कसा उपयोग होईल याची शिकवण या प्रयोगातून विद्यार्थ्यांना मिळाली आहे.