कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : – येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात भारताचे माजी कृषी व संरक्षण मंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा होत आहे. यानिमित्त महाविद्यालयात नुकत्याच वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयातील कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. सुभाष रणधीर यांनी भूषविले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. रणधीर यांनी, शरद पवार हे पुस्तकाच्या केवळ दोन पुठ्ठ्यात न घडलेलं असं बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. त्यांनी बालपणीच आपली ओळख निर्माण करून नेतृत्वगुणांची चुणूक दाखविली.
रयत शिक्षण संस्थेसारख्या एखाद्याच संस्थेचे ते अध्यक्ष नाहीत तर, अनेक क्षेत्रांचे मार्गदर्शक, तरुणांना लाजवणारी ऊर्जा असणारे नेते, राजकारणी तसेच समाजकारणी असल्याचे प्रतिपादन केले. या स्पर्धेत अभिजीत बाविस्कर, पांगारकर सानिका, खटकाळे पूजा, घोटेकर आदिती, देवरे हेमानी, झाल्टे, काकडे मयूर, भोसले समाधान, विधाते अश्विनी, ढसाळे श्रावणी, उगले अदिती अशा जवळपास वीस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर प्रभावीपणे आपले वक्तव्य सादर केले.
त्यातून त्यांनी अन्यायाची चिड व न्यायाची चाड असणारे व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील एक ध्रुवतारा, राजकीय विद्यापीठ, कृषी क्रांतीचा अग्रदुत, सुवर्ण महोत्सवी संसदपटू अशाप्रकारे माननीय शरदचंद्र पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दृष्टीपथात आणले. सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. आर. शेंडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देवकाते यांनी केले तर, उपस्थितांचे आभार प्रा. सुनील काकडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. उज्ज्वला भोर, डॉ. सुरेश काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रा.विजय रोहोम व प्रा.एम.ए.उमाप मॅडम यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले. अभिजीत बाविस्कर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक तर सानिका पांगारकर या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कार्यक्रमासाठी भोसले, देशमुख, शेंडगे, प्रा.शेळके, प्रा.रावसाहेब दहे, प्रा.डूबे, यांच्यासह श्रोते म्हणून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.