शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : तालुक्यातील आखेगाव शिवारात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घालत दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या करून जवळपास ५० हजाराचा ऐवज लांबविला असून मारहाणीमुळे पाच जण जखमी झाले आहेत. पोलीस अधिकारी, श्वान पथक व ठसे तज्ञ यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तो अयशश्वी झाल. या संदर्भात अक्षय राधाकिसन पायघन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आखेगावच्या पायघन यांच्या घरात रविवारी मध्यरात्री नंतर तीन चोरटे शिरले त्यांनी पायघन यांच्या आईला मारहाण करुन मध्ये आलेल्या वडिलांनाही काठीने मारहाण करून जखमी केले. पायघन यांच्या घरातून चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. अक्षय पायघन यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना दगड फेकून मारल्याने तेही जखमी झाले. घटनेचे साक्षीदार असलेले रामकिसन काटे यांच्या घरात घुसून चाळीस हजार रुपये चोरांनी लंपास केले.
पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सपोनि दीपक सरोदे यांनी घटनास्थळी लगेच भेट देऊन अहमदनगर येथून श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानाने घराजवळ जवळचा माग दाखविला. रामकिसन काटे, भाऊसाहेब काटे, ओमकार काटे, अक्षय पायगन सुशीला काटे असे पाच जण जखमी झाले असून सुशीला यांनी पती रामकिसन काटे यांना मारहाण करताना पाहिल्यानंतर ओरड केली.
यावेळी चोरट्यांनी धाक दाखवून त्यांना गप्प बसविले. शेजारी भाऊसाहेब काटे मदतीसाठी आले असताना त्यांच्यावरही चोरट्यांनी दगडफेक केली. त्यांच्या छातीला जबर मार लागला. ते ओरडल्यावर शेजारचे ज्ञानेश्वर पालवे बाहेर येताच चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक करून तेथून पळ काढला. जातांना नितीन पायघन यांच्या रिकाम्या खोलीचा दरवाजा उघडून बघितला, त्यानंतर ते पसार झाले.
सपोनि दीपक सरोदे तपास करीत आहेत. तीन दिवसापूर्वी चापडगाव शिवारात देखील जबरी चोरीची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागात गावाजवळ वस्ती करून राहणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने तपास करून लोकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.