कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : केंद्र व राज्य शासन आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे आज दि. २६ डिसेंबर २३ रोजी दुपारी ३.०० वा. कोपरगाव शहर येथे आगमन झाले. सर्वप्रथम सदर यात्रेच्या रथाची नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी बाईक रॅली काढून संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली.
भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनाचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावे या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल, मे -२०१८ तसेच माहे जून, ऑगस्ट २०१८ या कालावधीत विविध अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आलेली आहे. त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील तहसील मैदान व तुळजाभवानी मंदिर परिसर येथे राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने मंगळवार दि. २६/१२/२०२३ रोजी शहरातील तहसील कार्यालय मैदान येथे रथाचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम मा. आमदार आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन केले. याप्रसंगी बचत गटातील महिलांच्या मार्फत यात्रा रथाचे पूजन करण्यात आले. रथासोबत असलेल्या कर्मचारी यांचे मा.आमदार आशुतोषदादा काळे, मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील सारेगम लिटील चॅम्प कु. गौरी अलका पगारे हिचा नगरपरिषदे तर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मा.आमदार आशुतोषदादा काळे यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणात शहरातील वंचित पात्र लाभार्थ्यांनी सदर यात्रेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच सदर यात्रेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित विविध योजनेतील लाभधारकांना लाभाचे वितरण करण्यात आले. त्यात पीएम- स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान कार्ड योजना, उज्वला गॅस योजना, आधार अद्यावतीकरण तसेच दुरुस्ती आदी योजनांची माहिती देत पात्र लाभार्थी यांची नावे नोंद करण्यात आले. सदर प्रसंगी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेस उत्सुफुर्तपणे प्रतिसाद दिला.
याच प्रमाणे दि. २७ डिसेंबर २३ रोजी सकाळी १०.०० वा. तुळजाभवानी मंदिर परिसर येथे विकसित भारत संकल्प यात्रे निमित्ताने दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याही कार्यक्रमास शहरातील पात्र लाभार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असेही आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.
प्रसंगी नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोज पापडीवाल आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.