कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : क्रीडा व युवक संचनालय पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवकसेवा नाशिक विभाग, नासिक, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, नासिक, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, नासिक आयोजित राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नासिक जिमखाना येथे 22 व 23 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर साकरवाडीच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने (प्रसाद मयुरी जानकीराम, मलिक श्रध्दा रमेश, कुलाल तेजल नवनाथ, मलिक साक्षी रमेश, जाधव श्रेया श्रीकांत) संपूर्ण पुणे विभागाचे नेतृत्व केले.
स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत मुंबई, नागपूर विभागाला मागे टाकत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शाळेच्या नावलौकिकात मोलाची भर टाकली आहे. ज्या खेळावर पूर्ण देशात पुणेकरांचे वर्चस्व असताना वारी सारख्या खेड्यातील तळागाळातील मुलींनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. साकरवाडीचे खेळाडू सातत्याने स्पर्धा गाजवत आहेत. जानेवारी महिन्यात देखील राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावला होता.
या यशाचे पहिले श्रेय जाते संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय समीर सर यांना कारण त्यांनी तळागाळातील मुलामुलींना संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच गोदावरी बायो रिफायनरीजचे व्यवस्थापक सन्माननीय सुहासजी गोडगे साहेब यांनी सुद्धा सर्व मुलींचे वैयक्तिक पारितोषिके देऊन कौतुक केले. ते सातत्याने खेळाडूंना सहकार्य करत असतात.
तसेच व्यवस्थापनातील सर्व पदाधिकारी, सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख एजाज सर व त्यांची पूर्ण टीम जिल्हा क्रीडाधिकारी दिलीप दिघे, विशाल गर्जे, मिलिंद कुलकर्णी यांनीही मुलामुलींना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे व सातत्याने करत आहेत. तसेच प्राचार्या सुनीता पारे, सर्व शिक्षक शिक्षिका यांचेही सहकार्य नेहमीच लाभते. सर्व खेळाडूंना अमोलिक सर यांचे मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे. यशाचा हा आलेख असाच उंचावत राहो.