गोदाकाठ महोत्सवास ५ जानेवारीपासून प्रारंभ – पुष्पा काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : बचत गटाच्या महिलांना आर्थिक ताकद देणाऱ्या व वर्षभर महिला बचत गट ज्या पर्वणीची आतुरतेने वाट पाहत असतात तो ‘गोदाकाठ महोत्सव’ माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.०५) जानेवारी पासून मोठ्या उत्साहात सुरु होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी दिली आहे.       

 महिला बचत गटांना आर्थिक उत्पनाचे हक्काचे स्त्रोत निर्माण करून देणारा गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटांसाठी नेहमीच मोठी पर्वणी ठरत आला आहे. दोन वर्ष संपूर्ण विश्वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे हा ‘गोदाकाठ महोत्सव’ होवू शकला नाही. परंतु मागील वर्षापासून ‘गोदाकाठ महोत्सव’ पुन्हा मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. यावर्षी शुक्रवार (दि.०५) ते सोमवार (दि.०८) पर्यंत एकूण चार दिवस ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी दिली आहे.

महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देवून बचत गटांच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची जास्तीत जास्त विक्री होवून या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी उद्देशातून सुरु करण्यात आलेला गोदाकाठ महोत्सव जिल्ह्यासह राज्यपातळीवर पोहोचला आहे. बचत गटाच्या महिलांची ‘हक्काची बाजारपेठ’ अशी वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यात ‘गोदाकाठ महोत्सवाची’ झालेली आहे.

या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार (दि.०५) रोजी दुपारी ४.०० वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव तालुकयातील सर्व नागरिकांनी व बचत गटांच्या प्रतिनिधींनी भेट देवून अस्सल ग्रामीण संस्कृतीचा व गोदाकाठ महोत्सवाच्या विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेवून बचत गटाने तयार केलेल्या उच्च दर्जाच्या मालाच्या स्वस्त दरात खरेदी करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.