कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : “आदरणीय शंकरराव काळे साहेबांच्या प्रेरणेने कै.सुशीला उर्फ (माई) यांच्या स्मृती-प्रित्यर्थ ही वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्यात आली. ही स्पर्धा सुरू करणारे शंकरराव काळे साहेब हे एक सुसंस्कृत, सामाजिक बांधिलकी असलेले, कृषीतुल्य व्यक्तिमत्व होते. म्हणूनच ते महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यांनी सहजीवन, सहप्रेम जपणुकीचा आदर्श या स्पर्धेच्या निमित्ताने घालून दिला असे म्हटल्यास वावगे होणार नाही. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कॉलेज विकास समितीचे सदस्य ॲड. संदीप वर्पे यांनी केले. येथील एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये नुकतेच कै.सुशिला (माई) शंकररावजी काळे यांच्या स्मृती-प्रित्यर्थ २३ व्या ‘राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून श्री.संदीप वर्पे बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, “वक्ता होणे सोपे नाही. त्यासाठी धाडस, अभ्यास, वादक्षमता, आवाज असे वक्तृत्व गुण अंगी असावे लागतात. आजचे वक्ते कानभक्षक अधिक झाल्याचे दिसून येते. व्हाट्सअपच्या युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थी जगतात आज वक्त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. आजचे वक्ते हे भावी मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांनी सत्य बोलावे. अर्धवट माहितीवर बोलू नये”. अशीही सूचना त्यांनी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै.सुशीला काळे यांचे स्नेही सुनील जगताप हे होते.
स्पर्धेच्या निमित्ताने कॉलेजशी निर्माण झालेल्या ऋणानुबंधाला उजाळा देऊन त्यांनी, लोकांमध्ये गेल्याने खरे वक्तृत्व कळते, असे सांगितले. तसेच वक्तृत्वाचे विविध पैलू मांडत वक्तृत्व ही काळाची गरज असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.आर.आर. सानप यांनी प्रास्ताविकातून ‘ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा’ घेण्यामागील भूमिका विशद केली.
तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली सुपेकर, प्रा.रविंद्र हिंगे, प्रा.सुशीला ठाणगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.सुरेश काळे यांनी व्यक्त केले. सदर स्पर्धेसाठी डॉ.मंगला कुलकर्णी, डॉ. छाया शिंदे, प्रा.डॉ.जिभाऊ मोरे हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.