महिलांना यशस्वी उद्योजिका बनवण्याचा गोदाकाठ महोत्सवाची महत्वाची भूमिका – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : प्रत्येकाला ऑनलाईन वस्तू घरबसल्या मिळत असतांना देखील गोदाकाठ महोत्सवाला बचत गटाच्या महिलांचा मिळणारा प्रतिसाद व त्याच्या दुप्पट ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद यावरून हा “गोदाकाठ महोत्सव” बचत गटाच्या माता भगिनींना यशस्वी उद्योजिका बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा, महिला मंडळ कोपरगाव तसेच राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गोदाकाठ महोत्सव २०२४’ चे उदघाटन’ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासासाठी चार वर्षात रस्ते, पाणी, आरोग्य अशा मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या निधीतून मतदार संघातील बहुतांश विकास कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत, तर काही येत्या काही महिन्यात पूर्ण होणार आहेत. कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावाला दिलेल्या १३१.२४ कोटी निधीतील १५ टक्के लोकवर्गणीची २० कोटीची रक्कम देखील महायुती शासनाकडून मिळविण्यात यश आले व कोपरगावकरांवर या लोकवर्गणीचा बोजा पडू दिला नाही याचे मोठे समाधान वाटते.

प्रियदर्शनी इंदिरा, महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, आ.आशुतोष काळे, चैताली काळे यांनी गोदाकाठ महोत्सव हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवित असून या माध्यमातून महिला सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. गोदाकाठ महोत्सव २०२४ च्या आयोजनात महिला व बालविकास विभाग सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, महिला बालविकास अंतर्गत राबवली जाणारी लेक लाडकी योजना, उमेद आणि मविमच्या बचत गटांना दिला जाणारे अर्थ सहाय्य, त्यांचे वेगवेगळे स्टॉल्स याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. गोदाकाठ महोत्सवात आ. आशुतोष काळे यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर वेगवेगळे महिला बचत गट ज्यामध्ये उमेद, माविम व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचे बचत गट असतील यांना एक विक्री करण्यासाठी  या माध्यमातून केंद्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, वस्तू यांना चांगल्या पद्धतीचे मार्केटिंग व त्यांना दिलेले पाठबळ कौतुकास्पद आहे.

मतदार संघातील बहुतांश गावातील माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरविण्यात यश आले असून यापुढील काळातही विकासाला निधी कमी पडणार नाही. मतदार संघाच्या माता भगिनींना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पुष्पा काळे व चैताली काळे महिला भगिनींच्या सक्षमीकरणाची चळवळ चालवत आहे. त्या चळवळीला तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझे नेहमीच सर्वोतोपरी सहकार्य राहील. ज्या ज्यावेळी माझ्या माता भगिनींना अडचणी येतील त्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे.

बचत गटाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यवसायात माता भगिनिंचा आर्थिक विकास कसा साधला जाईल, त्यांना सोयी सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी माझा शासन दरबारी पाठ पुरावा सुरू असून माझे प्रयत्न लवकरच सत्यात उतरतील याचा मला विश्वास असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. महिला बाल कल्याण मंत्री ना.अदिती तटकरेंनी दिल्या शुभेच्छा.