गणेश साखर कारखान्याने ओलांडला १ लाख मे. टन गाळपाचा टप्पा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक अडचणी असताना देखील त्यावर मात करीत गणेशनगर (ता. राहाता) येथील गणेश सहकारी साखर कारखान्याने ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात १ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे. ‘गणेश’ च्या संचालक मंडळाने सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करीत कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालवून गाळपाचा हा टप्पा गाठला असून, त्याबद्दल आ.बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांनी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.  

गणेशनगर परिसरासह राहाता तालुक्याची कामधेनू असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीत सभासदांनी परिवर्तन घडवून कारखान्याची सत्ता ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात दिली. गणेश कारखान्याची सत्ता कोल्हे-थोरात युतीकडे आल्यानंतर नूतन संचालक मंडळाने थकीत आर्थिक देणी देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

यावर्षी गणेश साखर कारखान्याचा ६२ वा गळीत हंगाम सुरू असून, कारखान्याने ६६ दिवसांत २४ जानेवारी २०२४ अखेर १ लाख ६ हजार ६५० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ८ हजार ९०० पोती साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.५१ टक्के इतका आहे. यंदा कारखाना सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकदाही बंद राहिलेला नाही. अखंड गाळप सुरू आहे. गणेश कारखान्याची रिकव्हरी (साखर उतारा) गेल्या आठ-दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात घटली होती. परंतु यंदाच्या हंगामात साखर उतारा वाढला असून, तो १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

दररोज २३०० ते २४०० मे. टन गाळप केले जात आहे. गणेश कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून कारखान्यासह गणेशनगर परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. नूतन संचालक मंडळ उसाला निश्चितच चांगला भाव देईल. कारखाना चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन विवेक कोल्हे व आ.बाळासाहेब थोरात यांनी केले होते.

त्यास सभासद व शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते व सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक नितीन भोसले व व्यवस्थापनाने योग्य नियोजन केले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे गणेश कारखाना पुन्हा प्रगतीच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण करीत आहे.  

सत्य परेशान हो सकता हैं लेकीन पराजित नहीं अशीच चर्चा गणेश परिसरात कोल्हे-थोरात यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे सभासद आणि नागरिकांमद्ये सुरू आहे.

गणेश कारखाना मध्यंतरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्यानंतर माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अथक प्रयत्न करून तो उर्जितावस्थेत आणला होता. आठ वर्षांपूर्वी हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे तो पुन्हा संकटात सापडला होता. विरोधकांनी कारखान्यावर कर्जाचा बोजा करून ठेवला होता. आता हा कारखाना कोल्हे-थोरात युतीच्या ताब्यात आल्यानंतर कोल्हे व थोरात यांच्या नेतृत्वाखाली नूतन संचालक मंडळ कारखाना चालवत असताना विरोधकांनी राजकारण आणून जाणीवपूर्वक अनेक अडथळे निर्माण केले.

गणेश कारखान्याला जिल्हा बँकेने ४० कोटींचे कर्ज मंजूर केले होते; पण राजकीय विरोधकांच्या दबावामुळे ते मिळू शकले नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत विवेक कोल्हे यांनी गणेश कारखान्याला तन-मन-धनाने सर्वतोपरी मदत केली. त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यामार्फत ‘गणेश’ ला ऊस, ऊसतोड कामगार उपलब्ध करून देऊन आर्थिक, प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर केल्या. आ. थोरात यांनीही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यामार्फत ‘गणेश’ ला बहुमोल सहकार्य केले.

गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा दुष्काळामुळे उसाची कमतरता आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नूतन संचालक मंडळ खर्चात बचत करून कारखाना उत्तम प्रकारे चालवत असताना विरोधकांकडून सातत्याने जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. मात्र, तरीही कोल्हे व आ. थोरात यांच्या सहकार्याने गणेश कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यंदाच्या गळीत हंगामात गणेश कारखाना चांगल्या प्रकारे गाळप निश्चितच पूर्ण करील, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते व सर्व संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.