मोबाईलच्या वापरामुळे मुले अभ्यासा पासुन दुर जात आहेत – न्यायाधीश सयाजी को-हाळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : शाळा पातळीवर मोबाईल ही एक समस्या असून विद्यार्थ्यांना ती विनाशाकडे घेऊन जात आहे. यासाठी शिक्षक-पालक यांनी अत्यंत जागरुक राहून या संकटाला सामोरे गेले पाहिजे असे मत मा.सयाजी को-हाळे साहेब, जिल्हा न्यायाधीश -1 कोपरगाव, यांनी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात आयोजित, कोपरगाव तालुका विधीसेवा समिती आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सयाजी को-हाळे होते. विदयार्थींना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, मोबाईलचा उपयोग मर्यादीत स्वरुपात व योग्य ठिकाणी झाला पाहिजे. लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी राहिली नाही. त्या साठी पालक-शिक्षक व समाजातील घटकांनी जागरुक राहिले पाहिजे. त्यासाठी तालुका विधिसेवा समिती योग्य ते सहकार्य करेल.

या कार्यक्रमाच्या संयोजिका स्मिता एम. बनसोड, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कोपरगाव, यांनी विदयार्थींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,  प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढे जाणाऱ्या मुलांसमोर एक मोठे ध्येय असले पाहिजे. आता नवनवीन जे गुन्हे होत आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुले व मुलींचे प्रमाण जास्त आहेत. या मुलांची होणारी आयुष्याची दुर्दशा झालेली पाहिली की वाईट वाटते. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो. म्हणून यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत.

या कार्यक्रमात कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष, विद्यालयाचे माजी विद्यार्थी विधिज्ञ मनोहर येवले, यांनी देखील शाळेतच खरे संस्कार होतात, मी या शाळेत घडलो याचा मला अभिमान आहे असे म्हटले. या कार्यक्रमात विधिज्ञ अशोक टुपके, सहाय्यक सरकारी वकील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा न्यायालयांचे सहाय्यक सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी शालेय विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून कसे दूर राहता येईल व आपले ध्येय कसे साध्य करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी कोपरगाव वकील संघाच्या सदस्या विधिज्ञ एस. एस. देशमुख देखील उपस्थित होत्या. या प्रसंगी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी न्यायव्यवस्थेच्या मदतीने या नवतरुण विदयार्थींकडुन सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे नवनवीन गुन्हे घडु नये. यासाठी संस्था म्हणून आम्ही शिक्षकांच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करण्यास तयार आहोत याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिना पाटणी, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षिका उमा रायते तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले. आभार रघुनाथ लकारे यांनी मानले.