अल्पवयीन मुलीचा खून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :  नगर तालुक्यातील देहरे येथील अल्पवयीन मुलगी साक्षी तुकाराम पिटेकर हीच्या वर अत्याचार करून तीचा खून करण्यात आला. या घटनेचा त्वरित शोध घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शेवगावच्या सकल वडार समाजाने व वडार सक्षम फौंडेशन जिल्हा शाखेने दि.५ फेब्रुवारीला रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.   

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देहरे येथील काही नराधमांनी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीचा निघृण खून केला आहे. आरोपी गुंड असून त्यांची गावात दहशत असल्याने कोणीही पुढे येण्यास तयार नाही. झालेला अत्याचार व खून दाबण्यासाठी या गावगुंडानी संबंधित खुनाचे पुरावे नष्ट करण्याकरता व प्रकरण दाबण्याकरता पोलीस कर्मचारी चांगदेव हंडाळ यांस त्यांच्या मागणीनुसार काही रक्कम दिल्याचा आरोप करून त्यामुळे संबंधित कुटुंबाच्या न्याय हक्कावर गदा येत असल्याचे नमुद करून या घटनेत तीन चार आरोपीचा समावेश आहे.

यावेळचे काही प्रत्यक्ष साक्षीदारही आहेत. त्यांना धमकवण्याचा प्रकार आरोपी तसेच त्यांच्या नातेवाईक यांच्याकडून होत आहे. मयत मुलीच्या आईला व नऊ वर्षाच्या मुलाला त्रास दिला जात आहे. तरी त्याच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून निकाल लागेपर्यंत त्यांना पोलीस संरक्षण मिळावे आणि हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात यावे. तसेच या गुन्ह्याचे कामकाज फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे.

तसेच तक्रारीची शहानिशा करून लाच  देणाऱ्या व घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी वडार सक्षम फाउंडेशन जिल्हा शाखा व शेवगाव सकल वडार समाजाच्या वतीने दिनांक ५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात सकाळी दहाला रास्ता रोको करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे.

निवेदनाच्या प्रती शेवगाव पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस आयुक्त नाशिक, गृहमत्री, मुख्यमंत्री यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर राजू धनवडे, गोपाल कुसळकर, साईनाथ लष्करे, सागर चौगुले, दीपेश पिटेकर, दीपक देवकर, शिवराज पिटेकर, प्रकाश माने, विशाल धोत्रे,  प्रमोद धनवडे आदीच्या सह्या आहेत.