कोल्हे परिवाराचे ना.रामदास आठवले यांच्याशी जुने ऋणानुबंध – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार तत्त्वांवर आधारित जगात आदर्श असे भारतीय संविधान लिहिले. त्यांनी लिहिलेले भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. भाजप व पंतप्रधान नरेंद मोदी सरकारने संविधानाचा सन्मान केला असून, संविधान बदलण्याबाबतच्या अपप्रचाराला जनतेने बळी पडू नये. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे पासून कोल्हे परिवाराचे ना. रामदास आठवले यांच्याशी ऋणानुबंध असून, यापुढील काळातही हे ऋणानुबंध कायम राहतील, अशी ग्वाही कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

शनिवारी (३ फेब्रुवारी) कोपरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर माता रमाई जयंतीनिमित्त रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान सोहळ्याचे व सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलित, शोषित व वंचित लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी, कल्याणासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर लढा दिला.

मानवता धर्म जपा. माणसाशी माणसासारखे वागा, असा अनमोल संदेश देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात एकता, समता व बंधुतेचा पाया रचला. तळागाळातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना प्रगतीचा महामंत्र दिला. आज भारत देश ज्या वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत आहे त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने घालून दिलेल्या नीतीमूल्यांचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेत, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या मंत्रानुसार समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी काम करत असून, देशाला प्रगतीपथावर नेत आहेत.

स्नेहलता कोल्हे यांनी ना. रामदास आठवले, सुप्रसिद्ध व्याख्याते व संविधान अभ्यासक विठ्ठल कांगणे व भीमकन्या कडूबाई खरात यांचा सत्कार केला. तसेच कडूबाई खरात यांच्या भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाचा आनंद घेतला. कडूबाई खरात यांनी खास स्नेहलताताई कोल्हे यांच्या फर्माईशवरून ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र…’ हे गीत सादर करून वातावरण भीममय करून टाकले होते.

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची प्रशंसा केली. ना. आठवले यांनी त्यांच्या लग्नाची आठवण सांगताना ‘माझ्या लग्नाच्या वेळी अनेकांनी लाडू खाल्ले, कारण लाडू देणारे होते शंकरराव कोल्हे’, अशी कविता यावेळी सादर केली. स्व. शंकरराव कोल्हे यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध होते. समाजकारण व राजकारण करताना स्व. कोल्हेनी कायम सर्वसामान्य माणसांच्या विकासाचा विचार करून त्यांना न्याय मिळवून दिला.

आयुष्यभर ते दीन-दलित व तळागाळातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे हे स्व. शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवत उल्लेखनीय काम करत असून, जनतेने कोल्हे परिवाराला कायम साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. जोपर्यंत हा आठवले पठ्ठ्या मोदींसोबत आहे तोपर्यंत कोणालाही मोदी यांच्या विकास कामांचा रथ अजिबात अडवता येणार नाही.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एन. डी. ए. ला स्पष्ट बहुमत मिळून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त करत, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एन. डी. ए. ने रिपाइंला दोन जागा द्याव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून शिर्डीची जागा रिपाइंला मिळाल्यास तेथून निवडणूक लढविण्याचे संकेतही ना. आठवले यांनी दिले.

कार्यक्रमास रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राज्य सचिव दीपक गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुनील मोकळ, राजाभाऊ गायकवाड, सोमनाथ लोहकरे, रामदास कोपरे, किशोर मैंद, आकाश डोखे, मंगेश मोरे, राहुल सोनवणे यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, दलित समाजबांधव, संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.