संजय गांधी निराधार योजना व इतर योजना त्वरित मार्गी लावा – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०५ : संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ योजना व इतर लाभार्थ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेले ११०० हून अधिक प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात धूळ खात पडले आहेत. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना बैठक घेण्यास वेळ मिळत नसल्यामुळे सदर योजनांचे लाभार्थी शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत हे सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिला. 

कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कोपरगाव येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली जाते. त्यानुसार सोमवारी (५ फेब्रुवारी) युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी विवेक कोल्हे यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यास अधिकारी चालढकलपणा करीत असल्याचा आरोप करून अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला. तसेच आमदार काळे यांनी केलेल्या दुर्लक्षाने त्यांच्या निव्वळ फ्लेक्सबाजी कारभारावर कोल्हे यांनी टीकेची तोफ डागली.

ते म्हणाले, जुलै २०२३ मध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने संजय गांधी निराधार योजना, इतर योजनांतर्गत प्रस्ताव दाखल केलेले होते. जवळपास १११६ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. त्यापैकी काही प्रस्ताव मंजुरीसाठी बैठकीची आवश्यकता नसतानाही तहसीलदारांनी अद्याप सदर प्रस्ताव मंजूर केले नाहीत.

नोव्हेंबर २०२३ मध्ये संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी आ. काळे यांची नियुक्ती झाली. मात्र, तेव्हापासून त्यांनी कोणतीही बैठक न घेतल्याने अनेक गरजू वयोवृद्ध व दिव्यांग व निराधार नागरिक शासकीय अनुदानापासून वंचित असून, लाभार्थ्यांचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोपरगाव मतदारसंघासाठी ३ हजार कोटीचा निधी आणल्याच्या खोट्या वल्गना करणाऱ्या आमदारांना बैठक घेऊन गोरगरिबांचे प्रस्ताव मार्गी लावण्यास वेळ मिळत नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत.

विवेक कोल्हे यांनी जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला असून शिवजयंती पूर्वी सदर बैठक घेऊन प्रश्न सोडवला जावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्यास भाग पडेल त्यावर प्रशासनाने लवकरच बैठक घेऊन सदर प्रश्न सुटण्याचे आश्वासन देण्यास त्यांना भाग पडले.

कोपरगाव तालुक्यात अनेक प्रश्न गंभीर बनले असताना आमदारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांवर त्यांचा अजिबात वचक नाही. प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला असून, स्वस्त धान्याचा काळाबाजार होत आहे. ऑनलाईन प्रक्रिया व नवीन रेशनकार्ड वाटप केले जात नाही. कोपरगाव तालुक्यातील दोन हजारांवर शेतकऱ्यांना सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. घरकुल योजनेअंतर्गत अनेक गरजू नागरिकांना अजूनही घरकुल मिळालेले नाही.

आतापर्यंत दर महिन्याला समस्या सुटण्यासाठी १७ वेळा बैठका घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न व समस्या प्रशासनाकडे मांडत आहोत; पण अधिकारी कुणाच्या दबावात चालढकलपणा करत आहेत. सरकार विविध योजनांवर कोट्यवधींचा खर्च करत असतानाही योजना लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत याला कोण जबाबदार ? प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवू नये, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले. प्रशासनाने जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीस अप्पर तहसीलदार विकास गंबरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार कुलथे, राजू चौरे, भाजप नेते शरद थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, शहराध्यक्ष दत्ता काले, केशव भवर, मच्छिंद्र टेके, संभाजी रक्ताटे, रवींद्र पाठक, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सरपंच रवींद्र आगवन,

दीपक चौधरी, अनुराग येवले, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब पानगव्हाणे, उपसरपंच भगवानराव चव्हाण, जितेंद्र रणशूर, शफिक सय्यद, रवींद्र रोहमारे, सतीश रानोडे, भाऊसाहेब वाघ, गोरख टुपके, उल्हास पवार, उत्तम चरमळ, अंबादास पाटोळे, वसंत गायकवाड, संजय भवर, खलिक कुरेशी, सिद्धांत सोनवणे यांच्यासह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.