वाचन संस्कृती लोप पावत चाली

शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ : वाचन संस्कृती वृद्धिंगत करून ग्रंथालयांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी शेवगाव तालुका ग्रंथालय संघाची स्थापना करण्यात आली असून त्यात अध्यक्षपदी ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ गोसावी यांची, कार्याध्यक्षपदी हरीश भारदे तर सचिव पदी कैलास बुधवंत यांची निवड करण्यात आली.

सध्याच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली असून विविध समाज माध्यमांचे आव्हान ग्रंथालय चळवळी समोर आहे, शासनाकडून गेल्या बारा वर्षांपासून ग्रंथालयांना नवीन मान्यता देण्यात आलेली नाही. मिळत असलेले तुटपुंजे अनुदान व वृत्तपत्रे, नियतकालिके व ग्रंथ यांच्या वाढत्या किमती याचा ताळमेळ घालून ग्रंथालय चालक वाचकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे ग्रंथालयासमोर असणाऱ्या विविध अडचणी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न याबाबत संघटित होऊन आवाज उठवण्याची गरज होती म्हणून या संघाची स्थापना करण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रंथालयांना अ,ब,क,ड अशा वर्गवारी नुसार अनुदान मिळते. त्यात ५० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर, २५ टक्के रक्कम ग्रंथ खरेदीवर व २५ टक्के रकमेतून वृत्तपत्रे-नियतकालिके बिले, जागा भाडे, वीज बिल, फर्निचर आणि इतर अनुशंघिक खर्च करावा लागतो.

तसेच शासनमान्य सर्व ग्रंथालयांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी होते. संबंधित अधिकारी प्रत्यक्ष ग्रंथालयात येऊन त्याचे छायाचित्र घेऊन अनुदान देत असतात. यावेळी ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, अकबर सय्यद, कुंडलिक घुगे, जमीर पठाण, साजिद शेख, संतोष मेरड, सुरेश बडे, रामकिसन कराड, विजयकुमार लड्डा, दत्तात्रय गादे, राजेंद्र वडागळे, अच्युत भागवत, नाना मडके, अर्जुन उगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.