शेवगाव प्रतिनिधी, दि.११ : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यासाठी अंत्योदयाचा मंत्र घेऊन केंद्रातील भाजपा व महायुती शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या, या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्ता, बुथ प्रमुख मतदारसंघातील ३६५ बूथवर अहोरात्र कार्य करत आहे. भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष असून प्रथम राष्ट्र, हाच उद्देश ठेवून ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने काम करत असल्याचे प्रतिपादन आ.मोनिका राजळे यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आखेगाव-कळसपिंपरी-तोंडोली फाटा या चार कोटी रुपये किंमतीच्या साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे नलवडे या सहा कोटी ३७ लाख रुपये किंमतीच्या साडेआठ किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजपा तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, बापूसाहेब भोसले, बापू पाटेकर, शिवसेना तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे, बाबासाहेब किलबिले, आखेगावचे सरपंच शंकर काटे, भगवान काटे, ठाकूर निमगावचे सरपंच संभाजी कातकडे, राक्षीचे सरपंच भक्तराज कातकडे, हरिभाऊ झुंबड, डॉ. गणेश धावणे, शिवाजी काटे, बालूभाऊ झिरपे, सचिन खंडागळे मुख्यमंत्री ग्रामसडकचे शाखा अभियंता पवार, कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब मुरदारे उपस्थित होते.
आ.राजळे म्हणाल्या, आखेगाव सह परिसरातील नऊ गावामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदार यांच्या समवेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून ताजनापूर उपसा सिंचन योजनेतून या गावासाठी पाणी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, प्रश्न कोणीही मांडला असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मार्गी लावणे ही आमची जबाबदारी आहे. या योजनेसाठी राज्याबरोबर केंद्राचा ही निधी आवश्यक असून त्याकरिता पालकमंत्री व खासदार यांच्या समवेत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
असंख्य भारतीयांचे स्वप्न असलेल्या राम मंदिराचा प्रश्न केंद्रातील मोदी शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वाला आला, या सोहळ्यासाठी पंतप्रधानाच्या आमंत्रणाद्वारे आपल्या तालुक्याचे भूषण राम महाराज झिंजुर्के या भव्य-दिव्य सोहळ्यासाठी उपस्थित राहिले याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेब गोर्डे यांनी प्रास्ताविक केले. संभा काटे यांनी आभार मानले.