मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात विविध विकास कामांना चालना दिली. सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही भुमिका, निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार व शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांना ताकद व विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मानसिकता या सर्व गोष्टीचा विचार करत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारावर प्रभावित होत काल अखेर नितीनराव औताडे यांनी प्रवेश करत आपली भूमिका जाहीर केली.

उबाठा शिवसेनेच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिल्यानंतर औताडे काय भूमिका घेणार याकडे संबंध जिल्ह्माचे लक्ष लागले होते. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा व आपली भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे सोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी औताडे गेले असता त्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेतून पक्ष प्रवेश केला. ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी औताडे यांनी आपला त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी खा. सदाशिवराव लोखंडे, भगीरथ होन, बाळासाहेब पवार, संजय भोईर, माजी सरपंच संजय गुरसळ अदी उपस्थित होते.

खा. सदाशिव लोखंडे यांनी आपल्या कार्यकाळात निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी केलेले प्रयत्न व मतदार संघामध्ये केलेली विकासकामे विसरता येणार नाहीत. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विकास कामांची गती या पुढे देखील कायम ठेवण्यासाठी खा. लोखंडे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे नितीनराव औताडे यांनी यावेळी स्पष्ट केले.