बचत गटाच्या महिलांना ३३ लाखाचे धनादेश वितरण
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधतांना आ. आशुतोष काळे यांनी सर्वच घटकांचा विकास केला असून बचत गटाच्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचत गटाच्या महिलांचा देखील आर्थिक विकास झाला असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.
बचत गटातील महिलांना ३३ लाख रुपयांचे धनादेश वितरण सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, दोन दशकापूर्वी महिला बचत गट संकल्पना काय आहे हे ग्रामीण भागातील महिलांना माहिती नव्हते. त्यावेळी नाममात्र रक्कम गोळा करून महिला बचत गट स्थापन केले. या महिलांना चूल आणि मुल यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.
महिलांनी देखील अतिशय चिकाटीने काम केले आहे. त्यामुळे बचत गटातील महिलांना ३३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असून ही वाटचाल यापुढे देखील अशीच निरंतर सुरू राहणार आहे. बचत गटाच्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ आ. आशुतोष काळे मिळवून देत आहेत. बचत गटांना स्थायी स्वरूपाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे मतदार संघातील बहादरपुर येथे बचतगट भवन उभारले जाणार आहे.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना विविध घरगुती छोट्या मोठ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी मागील अकरा वर्षापासून गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले जात असून त्यामुळे महिला बचत गटाची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक उपक्रमांच्या अंतर्गत विविध बचत गटांच्या महिला अतिशय चांगले काम करीत असून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत याचे विशेष समाधान वाटते.
बचत गटाच्या महिलांनी समाजातील गरजू महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होतील व या महिलांची आर्थिक उन्नती होईल यासाठी प्रयत्न करावेत मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही सौ. पुष्पाताई काळे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी श्रीमती रमाबाई पहाडे, राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. स्वप्नजा वाबळे, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुरेंद्र यादव, कृषी अधिकारी नितीन देसळ, माजी नगरेसेविका सौ.माधवी वाकचौरे, विविध महिला बचत गटाच्या बचत गटांच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.