शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांची नोंद संबंधित शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर होणे आवश्यक असून आता ही नोंद शेतकऱ्याने स्वतः ईपीक पहाणी करण्याचा दंडक करण्यात आला आहे, मात्र अनेक शेतकरी ही बाब अनवधानाने गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे संबंधिताच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद करणे राहून जाऊ शकते. याकरता शेवगाव तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष किशोर पवार यांनी शेतकऱ्यांनी चालू हंगामातील रब्बी पिकाची ई पिक पाहणी त्वरित करावी म्हणजे रब्बी पिकाची नोंद तलाठ्यांना ओढणे सोयीचे होईल असे आवाहन केले आहे.
यासंदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिले असून त्यात म्हटले आहे की, सर्व शेतकरी खातेदार बंधु भगिनींना सूचित करण्यात येते की ज्या प्रमाणे आपण खरिपात आपल्या मोबाईल द्वारे इपिकपहाणी केली, त्याच प्रमाणे यावर्षीची रब्बी पिकांची देखील ई पिकपाहणी करणे आवश्यक आहे. तथापि आद्यपही बऱ्याच खातेदारांनी रब्बी ची ई पिकपहाणी केलेली नसल्याने त्यांचे ७/१२ वर रब्बी हंगामातील पीक ओढता आलेले नाही. तरी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.