कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी जाईल तिथे घराणेशाही बद्दल बोलतात. पण स्वतःच्या कुटूंबाचा पत्ता नाही आणि दुसऱ्यांची घराणेशाही काढतात असे म्हणत थेट पंतप्रधान मोदींवर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निशाणा साधला. कोपरगाव येथे बुधवारी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण शंकरराव चव्हाण यांचे पुञ आहेत ही घराणेशाही नाही काय. शिवसेनेशी गद्दारी केलेले मुख्यमंत्री व त्यांचा मुलगा तसेच काॅंग्रेस व शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्यांची घराणेशाही चालते. अगदी अजित पवार हे सुध्दा घराणेशाहीचं प्रोडक्ट आहे ते चालतात.
परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांनी जर मोदींच्या पाठीवर हात टाकला नसता तर आज मोदी हे आडवाणी, वाजपेयी यांच्यामध्ये दिसले नसते. त्याच बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्ववादी शिवसेना असलेली घराणेशाही तुम्हाला नको वाटतेय का? संघ मुक्त भारत करा म्हणणारा नितिशकुमार तुम्हाला चालतो.
काॅंग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले माणसं चालतात आणि हिंदूत्ववादी असलेल्या आमच्या घराणेशाही बद्दल बोलताय. होय मी ठाकरे घराणेशाहीतला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या कुटूंबावर प्रेम करतोय. उध्दव ठाकरे एकटा कोणी नाही. पण उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे.
देशातील शेतकऱ्यांचे घरच्या घरं उध्वस्त करणाऱ्यांनी घराणेशाहीवर बोलू नये असे म्हणत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.