कोपरगावचे सत्ता सम्राट जनतेला स्वच्छ पाणी देवु शकले नाहीत – संजय राऊत 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ :  गेली अनेक वर्षे आलटून पालटून सत्ता उपभोगणाऱ्या कोपरगावच्या सत्ता सम्राटांनी जनतेला किमान स्वच्छ पाणी सुध्दा दिले नाहीत. आजही नागरीकांना आठदिवसाड पिण्यासाठी गढुळ पाणी मिळते यावर खासदार संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त करीत तालुक्याच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

कोपरगाव शहरात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला या दरम्यान खासदार संजय राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की,  कोपरगाव शहराला मुबलक पाणी मिळावे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १३२ कोटी रुपये नवीन पाचव्या साठवण तलावासाठी मंजूर केले.

ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा तुम्हाला दररोज स्वच्छ पाणी मिळेल. आगामी विधानसभा निवडणुकीत ना काळे, ना कोल्हे आता फक्त शिवसेनेचा वाघ असणार आहे. येथे वर्षानुवर्षे आलटुन पालटुन सत्तेत असलेल्या सत्ता सम्राटांना इतक्या वर्षात जनतेला पिण्याचे पाणी देता आले नाही.  कोपरगावमध्ये आजही आठदिवसाड गढुळ पाणी पिण्यासाठी दिले जाते. 

येथील नेते अनेक दशका पासुन सत्तेत असुनही जर जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी देवू शकत नसतील, तर तुमची सत्ता काय कामाची.  कोपरगावकरांना स्वच्छ  मुबलक पाणी दररोज हवे असेल तर आगामी निवडणुकीत उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे लागेल. असे म्हणत राऊत यांनी कोपरगावच्या नेत्यावर सडकून टीका केली. 

दरम्यान कोपरगाव शहरात उध्दव ठाकरे आले. त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सह विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कोपरगावच्या उपस्थित समुदायांनी टाळ्या वाजवल्या पण ठाकरेंच्या भाषणापेक्षा खासदार संजय राऊत यांच्या भाषणाची कोपरगाव मध्ये जोरदार चर्चा रंगली. इतर वेळी संजय राऊत काय बोलले हे आवडले नसेल. पण कोपरगावच्या जनसंवाद मेळाव्यात जे बोलले ते तालुक्यातील नेत्यांसह नागरीकांना विचार करायला लावणारे आहे. 

निवडणुकीच्या काळात देश व राज्य पातळीवरील नेते कोपरगावमध्ये येतात आणि ज्यांच्या त्यांच्या परीने आश्वासन देवुन मतांचं राजकारण करतात. पक्ष कोणताही असो. लोकप्रतिनिधी कोणीही असो. भाषणाचा विषय व समस्या एकच असते ते म्हणजे कोपरगावचा पाणी प्रश्न. प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्न सोडविण्याचे ठरते. काही अंशी काम होते पण दररोज स्वच्छ पाणी काही मिळत नाही.

निळवंडेची पाईप लाईन असो किंवा साठवण तलाव असो. केवळ श्रेयवाद व आडवा-आडवी, जिरवा-जिरवी हे नित्याचेच झाले आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते अभ्यास कमी चर्चा ज्यास्त. पण आजपर्यंत पाणी काही ज्यास्त मिळाले नाही. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी आजही न सुटल्याने बाहेरुन आलेले नेते स्थानिक नेत्यांवर टीका करुन टाळ्या मिळवतात.

बाकी नळाला पाणी आठदिवसाड आणि तेही गढुळच. जो पर्यंत नळाला दररोज स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या या धामधुमीत कोपरगावचा पाणी प्रश्न गाजतच राहणार.