भारत बंद आंदोलनास शेवगावात उत्स्फुर्त प्रतिसाद

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ :  संयुक्त किसान मोर्चा व सेंट्रल ट्रेड युनियन्सने विविध प्रलंबित मागण्या संदर्भात पुकारलेल्या ग्रामिण भारत बंद आंदोलनास शेवगावात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.

भारतीय कम्युनिष्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा आयटक, आशा व गटप्रवर्तक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, लालबावटा रीक्षा युनियन, शाहिद भगतसिंग हॉकर्स युनियन, हमाल मापाडी संघटना यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

येथील नेवासे रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जून्या कार्यालयापासून काढण्यात आलेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून क्रान्ती चौकात आल्यानंतर तेथे रास्ता रोको करण्यात आले. भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, कॉ.संजय नांगरे, बापूराव राशिनकर, बबन पवार, भगवान गायकवाड, संदीप इथापे, वैभव शिंदे, गोरक्षनाथ काकडे, राम लांडे, गीता थोरवे, अंजली भूजबळ, सुमित्रा महाजन, एजाज काझी, संजय बडधे, आदिनी आपल्या भाषमातून विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कामगार व व्यापारी वर्गाच्या विरोधी धोरणा बाबत जोरदार टीका केली.

यावेळी या मार्गावरून कार्यक्रमासाठी जाणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे रास्ता रोकोत अडकले असता त्यांनीही आंदोलनात काही काळ सहभागी होऊन भाषण ठोकत विद्यमान सरकारचा आपल्या शैलीत समाचार घेतला. 

ॲड. लांडे म्हणाले, सध्या राज्य व केंद्राच्या सर्वच क्षेत्रातील चुकीच्या धोरणामुळे देश अधोगतीकडे मार्गक्रमण करत आहे. आशा व गट प्रवर्तकांच्या मागण्या मंजूर केल्याचे राज्य शासनने जाहीर केले, मात्र आज अखेर त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे गेल्या महिन्या पासून पून्हा दुसऱ्यांदा  आंदोलन सुरु आहे.

आठ दिवसापासून आशा स्वयंसेविका मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या रास्त मागण्यासाठी ठाण मांडून बसल्या आहेत. मात्र, त्यांना न्याय देण्यास राज्य शासनाला वेळ नाही. शेतकरी कामगारांच्या व्यथा कायम असून त्या सोडविणे तर लांब, त्या ऐकूण घेण्याची ही शासनाची तयारी नाही. अशी टीका केली. यावेळी आंदोलन कर्त्यानी दिलेल्या, भाजपा हटाव, देश बचाव, संविधान बचाव आदि घोषणांनी परिसर दणाणून गेला.