शिवजयंतीचे औचित्य साधत स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ अंतर्गत ‘स्वराज्य सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य, जिल्हा तसेच तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त दि.१२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवरायांच्या संकल्पनेतून शासन चालविण्याची प्रेरणा घेतो व महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमानाशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जोडलेला आहे. हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

त्यानिमित्ताने कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देखील आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कोपरगाव शहरात ठिकठिकाणी आरोग्य शिबीर, समाजिक उपक्रम राबविले जात असून तसेच चौका-चौकांत स्वराज्य पताका लावण्यात येणार असून विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहे. 

‘स्वराज्य सप्ताह’ निमित्त शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सोमवार (दि.१९) रोजी सायंकाळी ६ वाजता आपल्या संस्कृती समृद्ध असलेल्या आपल्या राज्याच्या व आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाराव आपल्या मराठी संस्कृतीची कीर्ती वृद्धिंगत करणाऱ्या ‘संस्कृती महाराष्ट्राची’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासह प्रत्येक शिवप्रेमींनी या स्वराज्य सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.