छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात खोलवर रुजलेला आहे. स्वराज्याचे स्वप्न पाहून मुठभर मावळ्यांच्या मदतीने हे स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम त्यांचा आदर्श व कर्तुत्व हे केवळ मराठी माणसांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी स्फूर्तीचा अखंड झरा आहे. त्यांचे जीवन म्हणजे अथक संघर्ष, अविचल जिद्द आणि अतुलनीय नेतृत्वाची गाथा असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

कोपरगाव शहरात विविध प्रभागातील शिवप्रेमींनी देखील आपापल्या प्रभागात शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या शिवजयंती उत्सवाला आ. आशुतोष काळे यांनी भेट देवून शिवप्रेमींचा उत्साह वाढविला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा परिधान केलेल्या व भगवा फेटा बांधलेल्या शिवप्रेमींसमवेत आ.आशुतोष काळे यांनी सेल्फी देखील काढला.

यावेळी कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर आ.आशुतोष काळे यांच्याकडून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी तसेच जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण येवून उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी-जय शिवाजीचा नारा देवून संपूर्ण परिसर दणादूण सोडला होता.

यावेळी हेलिकॉप्टरने होणारी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी कोपरगावकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक दूरदर्शी प्रशासक म्हणून पहिले जाते. त्यांनी न्याय, समानता आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन देणारी एक सुसंघटित प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली. प्रजेच्या कल्याणावर केंद्रित असणारी त्यांची शासनप्रणाली होती. कृषी, व्यापार आणि वाणिज्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराजांनी नेहमीच पुढाकार घेतला.

स्वराज्य निर्मितीसाठी हिंदू-मुस्लिम असा भेद न करता सर्वसामान्य लोकांना सोबत घेवून हिंदवी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्राधान्यक्रम देणाऱ्या महाराजांची स्वराज्य व जनतेप्रती असलेली कल्याणकारी ध्येय धोरणे नेहमीच मार्गदर्शक ठरणारी असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.