शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ :  स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा शेवगावसह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रविवार पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनेक शिवभक्तांनी केले.

शहरातील आबासाहेब काकडे विद्यालय, रेसिडेन्शिअल, पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालया सह विविध शैक्षणिका संस्थानी चित्तवेधक मिरवणुका काढल्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी हलगी पथक, झांज पथक, ढोल पथक, लेझीम पथक तसेच पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी आपली उत्कृष्ट कला सादर केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी मल्लखांबावर चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आखेगाव रस्त्यावरील स्वराज मंगल कार्यालयापासून काढलेली मिरवणूक श्री संत गाडगेबाबा चौक महामानव डॉ.आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर तेथे राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून महाआरती करण्यात आली. मिरवणुकीत श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे दीपक महाराज सुद्रिक, अनिता महाराज सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींचे पथक तसेच आखेगाव येथील श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या पथकाने सादर केलेल्या विविध भजनात उपस्थित शिवभक्त तल्लीन झाले होते.              

या चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने सकल माळी समाज, सकल परीट समाज, सकल नाभिक समाज, सकल कुंभार समाज व शिवभक्तांच्या वतीने अभिषेक करण्यात आला. माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते माजी सभापती अरुण लांडे ।श्री गुरुदत्त सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव फुलचंद आणा रोकडे यांच्यावतीने स्मारक समितीस प्रत्येकी एक लाख 11 हजार 101 रुपयांचा धनादेश स्मारक समितीचे डॉ. नीरज लांडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

यावेळी समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व शिवभक्तांची मोठी उपस्थिती होती क्रांती चौकात हभप झिंजुर्के महाराज यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे तसेच सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य व तमाम शिवभक्तांच्या उपस्थितीत शिव आरती करण्यात आली.

तालुक्यातील रांजणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार नरेंद्र घुले, अशोक महाराज बोरुडे नवनियुक्त उपजिल्हाधिकारी अविनाश लोढे, विकास कर्डिले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तालुक्यातील भावी निमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तमाम शिवप्रेमींच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

आज सोमवारी सार्वजनिक उत्सव समिती व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी उत्स्फुर्त रक्तदान केले. रोटरी अध्यक्ष मनेष बाहेती, प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. गणेश चेके, लोकमान्य हॉस्पिटल व अर्पण ब्लड बँकेने यासाठी मोठे योगदान दिले. यावेळी आयोजित कुस्त्यांच्या फडाने कुस्ती शौकिनाच्या डोळ्याचे पारणे फेडले.

महाराष्ट्र केसरी बाला रफिक यांनी छत्रपती चषकावर आपली मोहर उमटविली. हरियाणा केसरी बंटी कुमार, अभिजीत लोहारे, मनोज पवार, सागर कोल्हे, अक्षय कावरे, विजय डोंगरे यांच्यासह शेवगावचे भूमिपुत्र मल्ल ऋषिकेश विकास जोशी यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. मंगळवारी व बुधवारी होणाऱ्या भव्य  कबड्डी स्पर्धेत राज्यातील चाळीसावर संघ सहभागी झाले आहेत.