माथेफिरू पतीने हातोड्याने केला पत्नीचा खुन 

 बापाच्या रागाने दोन मुलं झाली अनाथ

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव येथील सैन्यदलात काम करणाऱ्या एका माथेफिरूने आपल्या पत्नीवर संशय घेवून भरदिवसा रस्त्यात खुन करीत पोटच्या दोन मुलांना अनाथ केल्याची घटना घडली.

 या घटनेची कोपरगाव शहर पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी  दुपारी कोपरगाव शहराजवळील जेऊर पाटोदा येथे आपल्या माहेरी राहणारी पुजा अरूण दाभाडे वय २६ वर्षे हि एका खाजगी हाॅस्पिटल मध्ये कामाला होती.

आपलं काम आटपून दुपारी घरी जात असताना पती अरुण रतन  दाभाडे हा रस्त्यामध्ये पुजाची  वाट पहात दबा धरून बसला होता. समोर पुजा दाभाडे येताच हातातील हातोड्याने डोक्यात वर्मी घाव घातल्याने पुजा ही जाग्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. डोक्याला जबर मार लागल्याने पुजाचा जागीच मृत्यू झाला. पुजा हिला एक मुलगा व एक मुलगी आहे. 

 घटनेची माहिती समजताच नागरिकांची एकच गर्दी झाली. पोलीसांनी या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेवून खुन करणारा नराधम अरूण दाभाडे याला त्याब्यात घेवून गजाआड केले. 

 दरम्यान  मयत पुजाचे  वडील किरण तुळशीराम पठारे  यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. त्यात ते म्हणाले की, पुजा दाभाडे हिच्यावर पती अरुण रतन दाभाडे रा. टिळेकर वस्ती, येवला रोड कोपरगाव हा कायम संशय घेत होता त्यातूनच सोमवारी दुपारी आडीज वाचण्याच्या सुमारास हातोडीने  वार करून जीवे मारल्याची तक्रार दिली आहे.

शिवजयंती एका बाजुला धामधूम सुरु असताना सैन्यात शिस्त पाळणारा पती अरुण दाभाडे  बेशीस्तीचा कळस करुन पत्नी पुजाला कायमचे संपले आणि पोटच्या दोन मुलांना अनाथ केल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

माथेफिरू पती अरूण दाभाडे याने या पुर्वीही पत्नी पुजावर संशय घेवून  कोयत्याने डोक्यात वर्मी घाव घालुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. माञ सुदैवाने डोक्यात ३२ टाके पडूनही पुजाला जीवदान मिळाले होते, पण मनात कपट असणाऱ्या अरूण दाभाडे यांने अखेर  पुजाचा जीव घेतलाच!