कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, समतेचे पुरस्कर्ते, आदर्श नीतिवंत राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या प्रेरणेने विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सुराज्य कसे निर्माण करावे, राज्य कसे चालवले पाहिजे, याचा आदर्श त्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला. सर्व राज्यकर्त्यांनी आणि युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी व सुराज्य निर्मितीसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, पराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त त्यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता व स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती असून, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. कोपरगाव शहर व तालुक्यासह संपूर्ण देशात आज शिवजयंती धूमधडाक्यात व जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. महान योद्धा, कुशल रणनीतिकार व शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे व भारताचेच नव्हे तर अवघ्या विश्वाचे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अपार संघर्षातून मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण केले.
सत्ता कशी आणि कोणासाठी वापरायची असते, राज्य चालवायचे ते रयतेसाठी याचा वस्तुपाठ त्यांनी जगाला घालून दिला. समता, बंधुता या मूल्यांची जोपासना करत त्यांनी लोकहित डोळ्यांसमोर ठेवून उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. सार्वजनिक प्रशासनात सुधारणा राबवून सुशासनाचा मार्गही दाखवला. त्यांचे नेतृत्व, संघटनकौशल्य, युद्धनीती, गनिमी कावा कौशल्यपूर्ण असून, जिद्द, चातुर्य व बुध्दीचा वापर करून त्यांनी शत्रूंना नामोहरम करून मोठा पराक्रम गाजवला.
छत्रपती शिवरायांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्वराज्यनिर्मितीबरोबरच त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आज संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. आजही जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते व त्यावर संशोधन होते ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपल्या सर्वांचे अस्तित्व आहे. त्यांचे अलौकिक कार्य व विचार आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात. बलशाली समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी शिवचरित्राचे अनुकरण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त उद्या मंगळवारी (२० फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचा शाहिरी शिवदर्शन पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी स्मारक येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शरद नाना थोरात, साहेबराव नरोडे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी.आर.काले, न. प. तील माजी गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष आर.डी.सोनवणे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, विजय आढाव, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, वैभव आढाव, भीमा संवत्सरकर, राजकुमार दवंगे, जितेंद्र रणशूर, दिनेश कांबळे, प्रमोद नरोडे, दीपक जपे, गोपीनाथ गायकवाड, साहेबराव शिंदे, रवींद्र रोहमारे, सतीश रानोडे, खलिकभाई कुरेशी, सलीम पठाण, हरिभाऊ लोहकणे, जयप्रकाश आव्हाड, सचिन सावंत,
विजय चव्हाणके, अॅड.वैभव बागुल, रोहित कनगरे, स्वप्नील मंजुळ, रवींद्र लचुरे, रूपेश सिनगर, रोहन दरपेल, सागर राऊत, अर्जुन मरसाळे, संजय खरोटे, चैतन्य जगदाळे, सुनील मुंगसे, आदित्य उदावंत, श्लोक बोरावके, सुरेश मरसाळे, रोहिदास पाखरे, अनिल गायकवाड, लियाकतभाई सय्यद, पियूष चिने, प्रसाद संवत्सरकर, महेंद्र नाईकवाडे, मयूर क्षीरसागर, गमे, अतुल सुराळकर, सतीश गोसावी, सोनू पवार, अजित जाधव, गणेश मोकळ, निलेश धिवर, कैलास सोमासे आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.