संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमाने कोपरगावकरांची मने जिंकली

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्याला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ आणि संत तुकाराम या वारकरी धार्मिक चळवळीतील मराठी संतांचा मोठा इतिहास लाभलेला असून हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आधार आहे.

१७ व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्थानिक मराठा साम्राज्याचा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रचंड प्रभाव असून याच संस्कृतीचे विलोभनीय दर्शन आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांसाठी आयोजित केलेल्या ‘संस्कृती महाराष्ट्राची’ या आगळ्या वेगळ्या लोकसंगीत, लोकनृत्याच्या मराठमोळ्या कार्यक्रमातून घडविली. या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शिवप्रेमींचा शिवजयंतीचा उत्साह द्विगुणीत झाला.

अखंड हिंदुस्थानचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात अत्यंत दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रमाणे कोपरगाव शहरात देखील आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने साजरी करण्यात येवून तरुणाईला आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशातून सोमवार (दि.१९) रोजी सायंकाळी कोपरगावकरांसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या ‘संस्कृती महाराष्ट्राची’ कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठी गर्दी केली होती. महिला भगिनींची संख्या देखील लक्षणीय होती. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे, शिवराज्यभिषेक सोहळा, शेतकरी, ग्रामीण भागाच्या चालीरीती व समृद्ध परंपरा व संस्कृतीचे दर्शन कलाकारांनी गीतातून व लोकनृत्यातून केलेल्या सादरीकरणातून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोपरगावकरांची मने जिंकली.

कोपरगावकरांनी देखील प्रत्येक गीताला व प्रत्येक नृत्यकलेला टाळ्यांची साथ देवून कलाकारांचा उत्साह वाढविला. तत्पूर्वी आ.आशुतोष काळे यांनी हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

कोपरगावच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार– छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ, मावळे फक्त यापुरतेच मर्यादित अजिबात नाही. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अशी सैनिकांना ताकीद देणारे ते शेतकऱ्यांचे कैवारी होते. स्त्रियांचा आदर आणि मानसन्मान करणारे व आपल्या मातेचा शब्द मानणारे आज्ञाकारी पुत्र होते. तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, बाजीप्रभू देशपांडे यासारखे अनेक हिरे जमवणाऱ्या महाराजांकडे माणसं ओळखण्याची कला होती. स्वराज्य निर्मितीबरोबर स्वराज्याचा गाडाही अतिशय व्यवस्थित चालवणारे महाराज कुशल प्रशासक देखील होते. त्यांच्या प्रेरणेतून कोपरगावच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहे.- आ.आशुतोष काळे.