शेवगाव प्रतिनिधी, दि.२१ : परिसरातील विस्थापितांच्या मुलांसाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने शिक्षणाची सोय केली. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाली त्यांनी हुरळून न जाता अभ्यास करावा. व ज्यांना मिळाले नाही त्यांनी देखील नाराज न होता पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करावा असे सांगून संधी कधी कोणाची वाट पाहत नाही आणि संधी कधी येईल हे ही सांगता येत नाही.
त्यामुळे सतत प्रयत्नवादी असावे असे आवाहन छत्रपती संभाजी नगरचे माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे केले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभ ज्येष्ठ कवी नारायण पुरी, माजी आयुक्त डॉ. भापकर तसेच संस्थेच्या विश्वस्त दीपलक्ष्मी म्हसे यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ.भापकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतत आपल्यामुळे आपल्या आई- वडीलांना अभिमान वाटेल असे काम केले पाहिजे. प्रत्येकजन हा वेगळा युनिक असतो स्वतःला शोधा, आत्मपरीक्षण करा, स्वतःला ओळखा, स्वतःशी प्रामाणिक रहा आणि स्वतःला सक्षम बनवण्याची संधी सोडू नका. आपली परिस्थिती जशी आहे, ती उत्तम मानून विश्वाला वंदनीय काम करा असा सल्ला डॉ. भापकर यांनी यावेळी दिला.
संस्थेच्या सदस्या निर्मला काटे, बापूसाहेब भोसले, माजी उपप्राचार्य प्रा. विक्रम लांडे, डॉ. युवराज सुडके, प्रा. भाऊसाहेब अडसरे, डॉ. गोकुळ मुंढे, डॉ. रविद्र वैद्य, प्रा.मिनाक्षी चक्रे, अंबादास गायकवाड, यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्नेह सम्मेलनाचे कार्यध्यक्ष डॉ. अशोक चोथे यांनी अहवाचन केले. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रा. सोपान नवथर आणि प्रा.विठ्ठल देवढे यांनी सुत्र संचलन केले. प्रा. अपर्णा वाघ यांनी आभार मानले.