शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : गंगोत्री पतसंस्थेचे सर्व व्यवहार पाहता तालुक्याच्या अर्थकारणात ही संस्था भरीव काम करत आहे. येथे येण्या पूर्वी मी पतसंस्थेचे बॅलन्सशीट पाहिले ते पाहून खूप आनंदी झालो. अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी शेवगाव येथे काढले.
येथील गंगोत्री पतसंस्थेचा स्थलांतर व सोनेतारण कर्ज सुविधांचा शुभारंभ ओमप्रकाश दादाप्पा कोयटे तथा काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. यावेळी अॅड.शिवाजी काकडे, जि.प.सदस्या हर्षदा काकडे, सुधीर सबलोक, अंकुश देवढे, द्वारकानाथ लाहोटी, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, मंदाकिनी पूरनाळे, लक्ष्मण बिटाळ, रावसाहेब बर्वे, कारभारी मरकड, राजेंद्र फलके, मधुकर देवणे, अॅड.बुधवंत, अॅड.कारभारी गलांडे, अॅड.शेळके, शिवाजी औटी, भाऊसाहेब पोटभरे, भारत लांडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, उपस्थितीत होते.
कोयटे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात पतसंस्था माझा श्वास व माझा ध्यास अशा पद्धतीने मी काम करत आहे. या संस्थेचे बॅलन्सशीट पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटले कारण खूप प्रगतीच्या दिशेने ही संस्था वाटचाल करत आहे. पतसंस्था वाढविण्यासाठी तिचे चालक कोण आहेत हे महत्त्वाचे असते. काकडे दांपत्य अत्यंत सुसंस्कृत विचाराचे दांपत्य आहे. ‘त्यामुळे या पतसंस्थेचा आर्थिक आलेख भविष्यात उंचावलेला दिसणार आहे.
पतसंस्थेने सोनेतारण व्यवहार सुरु केला तो योग्यच आहे. कारण आज परप्रांतीय संस्था मिळून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. खाजगी सावकारही लूट करत आहेत. त्याला अशा चांगल्या पतसंस्थेमुळे लगाम बसणार आहे. अॅड. शिवाजी काकडे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचे अर्थकारण सुधारण्याची गरज आहे.
आपण त्यामध्ये खूप मागे आहोत. काही विशिष्ट समाजाने त्यामध्ये खूप प्रगती केली आहे, परंतु ग्रामीण भागात आजही शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गंगोत्रीने आता सोनेतारण सुविधा सुरू केली आहे. संस्थेचे चेअरमन गोविंद वाणी यांनी प्रास्ताविक केले. जरीना शेख यांनी सुत्र संचलन केले. अशोक आहेर यांनी आभार मानले.