धनादेश न वाटल्याने सहा महिन्यांची तुरूंग वारी

ज्योती पतसंस्थेला खोटा धनादेश देणाऱ्याला न्यायालयाने दिली शिक्षा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : कोपरगाव येथील ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला एका कर्जदारानाने कर्ज चुकवण्याच्या नादात न वाटणारा धनादेश दिला. धनादेश देवूनही तो न वाटल्याने कर्जदाराला थेट तुरूंगाची हवा खाण्याची वेळ ज्योती पतसंस्थेने आणली आहे. 

या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगावच्या ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेत शिवकीरण केशव आमले यांनी कर्ज घेतले होते. संबंधित कर्जाची परतफेड करण्यासाठी आमले यांनी ज्योती सहकारी पतसंस्थेला पाच लाखांचा धनादेश दिला होता. सदरचा धनादेश न वटल्याने ज्योती सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने आमले यांच्यावर रितसर कोपरगाव न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला.

ज्योती पतसंस्थेच्या वतीने ॲड.एस.डी. काटकर यांनी न्यायालयासमोर कर्जदार शिवकीरण आमले यांनी संस्थेची कशी फसवणुक केली आहे हे पटवून दिले. अखेर कोपरगाव न्यायालयाचे वरिष्ठ स्तर न्यायाधीश भगवान पंडित यांनी कर्जदार शिवकीरण आमले यांना दोषी ठरवत ५ लाखांच्या धनादेशाच्या बदल्यात ७ लाख भरण्याचे आदेश देवुन सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

संबंधीत आरोपीने जर दोन महीन्याच्या आत सात लाख नाही भरले तर, पुन्हा सहा महिन्याचा वाढीव कारावास भोगावा लागणार आहे. अशी शिक्षा दिल्याने बनावट धनादेश देणाऱ्यांचे व आर्थिक फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. धनादेश देवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माञ, कोपरगावच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे अनेकांना लगाम बसण्याची शक्यता आहे.